कणकवली ः कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीच्या सर्व 17 उमेदवारांनी ‘क्रांतिकारी विचार पक्ष’ म्हणून आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सोमवारी सादर केले. शहर विकास आघाडीला काँग्रेस, ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही पाठिंबा दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संदेश पारकर व त्यांच्या सर्व उमेदवार आणि आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात श्री स्वयंभूचे तसेच परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसिल कार्यालयाकडे आले. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली, उपनेते संजय आग्रे, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागेश मोर्ये, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, शिंदे शिवसेनेचे शेखर राणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत पत्नी सौ. समृध्दी पारकर या उपस्थित होत्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना संदेश पारकर म्हणाले, हा कणकवली पॅटर्न आहे जो संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा कारभार आहे त्या विरोधात लढले जाईल. ही निवडणूक नगरपंचायतींच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही लढतोय.