कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावर गडनदी पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देत फरफटत नेल्याच्या अपघातातील गंभीर जखमी झालेला दक्ष रूपेश जाधव (10, रा. हळवल-बौद्धवाडी) या बालकाचे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.
जि. प. शाळा हळवल नं-1 येथे चौथीत शिकत असलेल्या दक्ष याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी रात्री 8.15 वा. च्या सुमारास दक्षची आई सोनाली जाधव त्याला कणकवलीतून क्लास सुटल्यानंतर हळवल येथे दुचाकीने घरी घेऊन निघाल्या होत्या. गडनदी पुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात दक्ष आणि सोनाली दुचाकीवरून फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या होत्या. ट्रक चालकाने ट्रकच्या पुढील चाकात अडकलेली दुचाकी सुमारे 150 फुट तशीच फरफटत नेली होती. गंभीर जखमी झालेल्या दक्ष आणि सोनाली जाधव या माय लेकाला तातडीने उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, दक्षची प्रकृती अधिकच नाजूक बनल्याने त्याला गोवा-बांबोळी येथे उशिरा हलविण्यात आले होते. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र दक्षची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आणि शुक्रवारी रात्री 9 वा. च्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर सोनाली यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.