कणकवली : आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी जगदीश कातकर. सोबत तहसिलदार दीक्षांत देशपांडे. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News|नैसर्गिक आपत्तीत गावपातळीवर उपाययोजना करा

कणकवली तालुका आढावा बैठकीत प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अत्यावश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी ही फक्त तालुकास्तरावर किंवा महसूल यंत्रणेची आहे असे नाही तर सर्वप्रथम गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. त्यासाठी ग्रामपंचायतीनी अत्यावश्यक साहित्य गाव पातळीवर उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. तसेच आपत्तीच्या कालावधीत कोणीही कर्मचारी गैरहजर राहणार नाही याची त्या-त्या कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी. आपत्कालीन स्थितीत अत्यावश्यक उपाययोजना तातडीने पोहोचविण्याच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. यावेळी काही विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचेही स्पष्ट केले.

येथील तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. कातकर बोलत होते. तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी श्री. कातकर यांनी विविध खात्यांचा सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ठिकाणी साईड पट्टीचे काम करणे, राष्ट्रीय महामार्गावर निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी रम्बलर बसवणे, तसेच दोन्ही रस्त्यांच्या आवश्यक ठिकाणी तातडीने खड्डे भरणे व धोकादायक झाडांच्या फांद्या किंवा बॅनर हटविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नडगिवे येथे रम्बलर बसवण्याचे काम सुरू असून कणकवलीत लवकरच करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कासार्डे ओव्हर ब्रिजच्या कोसळलेल्या प्लास्टर बाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. नैसर्गिक आपत्ती कालावधीत शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पाणी शुद्धीकरण करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला देण्यात आल्या. ज्या शाळांची तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे, निर्लेखन करणे आवश्यक आहे, त्या कार्यवाह्या तात्काळ करा. पावसाळ्याच्या कालावधीत पुराचे पाणी आल्याने धोका उद्‌भवू शकतो, अशा शाळांच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर आवश्यक निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यासाठी मुलांना आवश्यकतेनुसार घरी सोडायचे आल्यास जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच यायला हवेत अशी आवश्यकता नाही. स्थानिक परिस्थिती पाहून त्याच्या पातळीवर अत्यावश्यक उपाययोजना तातडीने केल्या जाव्यात असेही श्री. कातकर यांनी स्पष्ट केले.

गावपातळीवर काही आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास तातडीने तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस स्टेशन अशा ठिकाणी फोन केले जातात. हे जरी आवश्यक असले तरीही या कार्यालयाची जबाबदारी ही समन्वय साधण्याची आहे. यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायत पातळीवर अत्यावश्यक साहित्य यात टॉर्च, कटर, लाईफ जॅकेट, दोरखंड असे साहित्य उपलब्ध करून घ्यावे. तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्यकतेनुसार कार्यवाही सुरु करावी. आवश्यक ती जागा मदत लागल्यास तालुका पातळीवरूनही सहकार्य करण्यात येईल. मात्र प्रमुख जबाबदारी ही त्या-त्या ग्रामपंचायतींची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यांनी या अनुषंगानेआपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तत्पर राहावे अशा सूचनाही श्री. कातकर यांनी दिल्या.

महावितरणचाही आढावा घेण्यात आला. अलीकडे झालेल्या वादळी पावसात खारेपाटण, चिंचवली भागात खंडित झालेल्या वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. हा भाग कणकवली तालुक्याकडे येत नसला तरीही महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी याप्रकरणी लक्ष घालून अशा स्थितीत अपडेट करणे व तातडीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तसेच आवश्यकता वाटल्यास मनुष्यबळ वाढवण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी बीएसएनएलच्या टॉवर बाबतही चर्चा झाली. यवतेश्वर येथील टॉवरसाठी जागा निश्चित होत नसल्याने तो सुरू करता येत नसल्याचे सांगण्यात आले.

कृषी विभागाच्या घेण्यात आलेल्या आढाव्यात मंडळ स्तरावर पर्जन्यमापके बसवण्यात आलेली आहेत. फोंडाघाट येथील जागा बदलण्याबाबतचा विषय मार्गी लागला असून तेथील नवीन जागेत स्वयंचलित पर्जन्यमापक बसवण्यात आलेले आहे. तर अन्य नवीन तीन मंडळांच्या ठिकाणी लवकरच कार्यवाही होईल असे सांगण्यात आले. यावेळी आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय येथील औषधसाठा साथ रोगाचे अनुषंगाने उपाययोजना याबाबतही आढावा घेण्यात आला. फोंडाघाट रस्त्यात संदर्भात झालेल्या चर्चेत हा रस्ता एमएसआरडीसीकडे असल्याने तेथील आपत्कालीन परिस्थितीतील उपायोजना त्या त्याच विभागाकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कणकवली शहरातील गटार साफसफाई रस्त्यांवरील खड्डे आदीबाबत आढावा घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT