SSC Exam pudhari
सिंधुदुर्ग

SSC Exam | कणकवलीत लेकीच्या जिद्दीने पाणावले साऱ्यांचे डोळे; आईच्या निधनाचे डोंगरएवढे दुःख पचवून सई पोहोचली परीक्षा केंद्रावर

SSC Exam | शिवडाव-ओटोसवाडीतील संतोष सावंत कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र दुःखद दुःखद होती. रात्री कुटुंबातील सर्वजण नेहमीप्रमाणे झोपी गेले.

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

शिवडाव-ओटोसवाडीतील संतोष सावंत कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र दुःखद दुःखद होती. रात्री कुटुंबातील सर्वजण नेहमीप्रमाणे झोपी गेले. दरम्यान पहाटे ४ वा. च्या सुमारास संतोष सावंत यांची पत्नी साक्षी सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. उपचाराची कोणतीही संधी मिळाली नाही एवढा मोठा तो आघात होता.

आईच्या मृत्यूच्या या अकल्पित प्रसंगानंतरही लेक सई हिने कनेडी केंद्रावर जात आपला दहावीच्या परीक्षेचा भूगोल विषयाचा शेवटचा पेपर दिला. पेपर संपल्यानंतर सायंकाळी ती घरी आल्यावर आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आईच्या निधनाचे दुःख असतानाही सईने दाखविलेल्या धाडसाने साऱ्यांचेच डोळे पानावले. शिवडाव माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गातील सई संतोष सावंत हिला बुधवारी पहाटे अतिशय वेदनादायी घटनेला सामोरे जावे लागले. शिवडाव ओटोसवाडी येथील घरी वडील संतोष, आई साक्षी, लहान भाऊ हर्ष व सई असे चौघेजण रहातात. बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सई हिची आई साक्षी सावंत यांचे आकस्मिक निधन झाले. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने सारेचजण हडबडून गेले.

सईचा तर दहावीचा शेवटचा पेपर होता. अशावेळी शिवडाव विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शेजारील नागरिकांनी तिला धीर दिला आणि दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्याचे मानसिक बळ दिले. आईचा मृतदेह घरात असतानाही सई बुधवारी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. साक्षी सावंत यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळाल्यानंतर ओटोसवाडीसह संपूर्ण शिवडाव गावात शोककळा पसरली.

त्यातच सई सावंतचा दहावीचा शेवटचा पेपर असल्याने शिवडाव विद्यालयाचे शिक्षक तातडीने तिच्या घरी पोहोचले. दहावीची परीक्षा सुरू असताना कु. सई हिला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी नेहमी धावपळ व तिची तयारी करणारी आई आज घरात निपचित पडली होती. मात्र या प्रसंगातही अवघ्या १६ वर्षाची कु. सई ही धिराने उभी राहिली आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचली.

आईच्या आठवणी मनात असतानाही तिने भूगोलचा पेपर दिला आणि पुन्हा घरी येत तिने आईचे अंतिम दर्शन घेतले. शिवडाव येथे शोकाकुल वातावरणात बुधवारी सायंकाळी सौ. साक्षी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सौ. साक्षी यांच्या आकस्मिक निधनाची हळहळ व्यक्त होतानाच कु. सई हिने धाडसाने या प्रसंगाने सामोरे जात भूगोलाचा पेपर दिल्याने त्याचीही चर्चा होत होती.

सईचे वडील संतोष यांचे कनेडी बाजारपेठ येथे इलेक्ट्रीकचे दुकान आहे तर लहान भाऊ हर्ष हा आठवीमध्ये शिकत आहे. खरेतर सईने दहावीची परीक्षा दुःखातही मोठ्या धाडसाने दिली. मात्र आता आईच्या पश्चात तिच्या आठवणी सोबत घेत कौटुंबिक जबाबदारीचीही परीक्षा द्यावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT