कणकवली : कलमठमध्ये महावितरणसंबंधी अनेक प्रश्नांबाबत महावितरणचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी कार्यालयात पोचलेल्या कलमठ ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी सर्वप्रथम कलमठ विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे बोलावून घेण्याची मागणी केली. श्री.बोंगाळे येताच ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज समस्यांबाबत फोन लावला तरी ते फोन उचलत नाहीत. ग्रामस्थांना योग्य उत्तर देत नाहीत. असे सांगत आक्रमक ग्रामस्थांनी श्री. बोंगाळे यांना धारेवर धरले. यावरून श्री. बोंगाळे व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
यावेळी श्री. बगडे यांनी कनिष्ठ अभियंत्यांना फोन उचलण्यासहित नागरिकांशी सौजन्याने वागण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी श्री.बोंगाळे यांनी आपणाला कामे लेखी देण्यात यावी, तोंडी सांगून आपण कामे करणार नाही,असे सांगताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. वीज समस्यांबाबत व आपत्कालीन स्थितीत आम्ही आपणाला फोन करतो त्यावेळी आपण फोन न उचलल्यामुळे आम्हालाही कार्यकर्ते, ग्रामस्थांना उत्तरे देता येत नाहीत. योग्य माहिती वेळीच मिळाली तर सहकार्य करता येते,असे संदीप मेस्त्री म्हणाले. दरम्यान गावातील वायरमननाही बोलावण्यात आले. त्यांनीही श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत अधिकार्यांसमोरच स्पष्ट भूमिका मांडली. श्री.बगडे यांनी कलमठ मधील वीज समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आपण कार्यवाही करतो असे आश्वासन दिले.
महेश लाड, निसार शेख, नितीन पवार, अनुप वारंग, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर, गुरु वर्देकर, बाबू नारकर, अमजद शेख, तेजस लोकरे, प्रकाश सावंत, प्रणय शिर्के, एके तावडे, स्वरूप कोरगावकर उपस्थित होते.
या प्रश्नांबाबत येत्या आठवठाभरात कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल तसेच कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले.