कुडाळ : एसटी बसमधील प्रवास चक्क चोरीचं मैदान बनल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, मालवण-कुडाळ दरम्यान प्रवास करत असताना 13 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांनी कौशल्याने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी मुंबईतील सराईत चोरट्यास अटक करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे.
20 जानेवारी रोजी सौ. सुहासिनी रमाकांत पाटकर (64, रा. वायरी भूतनाथ, ता. मालवण) या मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशनकडे एसटी बसने प्रवास करत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास केली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी स्वतंत्र तपास पथक स्थापन केले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. अखेर संशयित मंगेश नाथुभाई नटू (55, रा. कोकरे आगार, सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपीने चोरी केलेले दागिने मुंबईत लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार कुडाळ पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत धाड टाकून सुमारे 13 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 6 हजार रुपये रोख हस्तगत केले. ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला असून, कुडाळ पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.