Jayendra Parulekar 
सिंधुदुर्ग

Jayendra Parulekar| सर्वाधिक पावसाच्या सिंधुदुर्गात दुष्काळ ही गंभीर बाब!

बेसुमार वृक्षतोडीमुळेच जिल्ह्यात हे नैसर्गिक संकट : डॉ. जयेंद्र परुळेकर

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पावसाळा अधिकृतरित्या अजून संपलेला नसून परतीचा पाऊस व्हायचा बाकी असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणे ही अत्यंत अनाकलनीय आणि गंभीर बाब आहे. 'सुपर अल निनो'मुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून राज्यातील जवळपास २८५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र राज्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या सिंधुदुर्गात ही भीषण परिस्थिती ओढावणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.

डॉ. परुळेकर म्हणाले, शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अवघ्या तीन तालुक्यांत आणि रायगड जिल्ह्यातील एकाच तालुक्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. रायगडमध्ये यावर्षी नेहमीच्या तुलनेत ९१ टक्के, रत्नागिरीत ८५ टक्के, तर सिंधुदुर्गात मात्र अवघा ७४ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सिंधुदुर्गातील या परिस्थितीला केवळ अस्मानी संकट कारणीभूत नसून सुल्तानी संकटही तितकेच जबाबदार आहे. जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात सातत्याने होत असलेली बेसुमार वृक्षतोड हेच पर्जन्यमान घटण्याचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सप्टेंबर अखेरीसच दुष्काळ जाहीर झाल्यामुळे येणाऱ्या हिवाळ्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याचे चित्र आहे. यामुळे भीषण उन्हाळ्यात सामान्य नागरिकांना पाण्याच्या गंभीर टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सलग कित्येक आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे भात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. आधीच प्रचंड वाढलेली महागाई आणि अभूतपूर्व बेरोजगारी यांमुळे होरपळणाऱ्या सामान्य जनतेसाठी हा दुष्काळ म्हणजे "दुष्काळात तेरावा महिना" ठरत आहे. या कठीण परिस्थितीत आगामी उन्हाळ्यात जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT