देवगड : जामसंंडे-सोहनीवाडी येथील संतोष मोहन कदम (42) यांचा सोहनीवाडी येथीलच एका शेत विहिरीच्या पाण्यामध्ये त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास तरंगताना दिसला. श्री. कदम हे शुक्रवार सकाळपासून बेपत्ता होते. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.
संतोष कदम हे मोलमजुरीचे काम करत असत. शुक्रवारी सकाळी 8 वा. ते कामासाठी घरातून बाहेर निघाले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत म्हणून कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली. शनिवारी दिवसभर कुटुंबिय व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान त्यांचा मुलगा दयानंद याला शनिवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास सोहनीवाडी येथील भोवर यांच्या शेतविहिरीमध्ये वडिलांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याबाबत वाडीतील ग्रामस्थांना सांगितल्यानंतर देवगड पोलिस स्टेशनला कळविण्यात आले.
एएस्आय अनिलकुमार पवार, पोलिस हवालदार आशिष कदम, विश्वास पाटील, होमगार्ड जोईल यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला. कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.