देवगड ः पडवणे येथील अजय मारुती जाधव (वय 47) व त्यांच्या कुटुंबाला तसेच तेथील प्रमोद दशरथ जाधव, रामकृष्ण आबा जाधव, वसंत बाळकृष्ण जाधव यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समाज मंदिरामध्ये साजरे होणारे सण व उत्सवांमध्ये प्रतिबंध केला. तसेच त्यांच्या घरी साजरा होणारा गणेश चतुर्थी सण व इतर सणांवर बहिष्कार घालून समाजापासून व समाजाद्वारे साजरे होणारे सण उत्सवांपासून अलिप्त ठेवण्यात आले. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार तेथील महेश नागेश जाधव (55, रा. पडवणे) याच्यासह एकूण 12 संशयितांविरुद्ध देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 4 जानेवारी 2024 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. पोलिसांयच्या माहितीनुसार, पडवणे येथील महेश नागेश जाधव (55), प्रशांत मोहन जाधव (52), कृष्णा बळीराम जाधव (47), जितेश जयप्रकाश जाधव (35), सत्यवान नागेश जाधव (48), गणेश मंगेश जाधव (29), सुशांत सरदार जाधव (32), उमेश दत्तात्रय जाधव (47), विजय बाळकृष्ण जाधव (60, रा. मुंबई), बाजीराव मनोहर जाधव (54), दिनेश गजानन जाधव (62, रा. मुंबई), सुरेश रामचंद्र जाधव (42, रा. मुंबई) या संशयितांनी तेथील फिर्यादी अजय मारुती जाधव यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच प्रमोद जाधव, रामकृष्ण जाधव, वसंत जाधव यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जाधव समाजातील श्री देव फटोबा मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व कुलस्वामिनी मंदिरामध्ये साजरे होणारे सण व उत्सवांमध्ये प्रतिबंध केला. तसेच त्यांच्या घरी साजरा होणारा गणेश चतुर्थी सण व इतर सणांवर बहिष्कार घातला.