Banda Electricity Department Protest
बांदा : इन्सुली गावात गेले काही दिवस सतत खंडित वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या बांदा कार्यालयात धडक देत कनिष्ठ अभियंता आर. जी. ठाकूर यांना जाब विचारला. जोपर्यंत इन्सुली गावातील विजेचा लंपडाव थांबत नाही, तोपर्यंत इन्सुली सबस्टेशनमधून कुठल्याही गावाला किंवा आस्थापनेला नवीन कनेक्शन देऊ नये. आमचा गावाचा प्रश्न मार्गी लावण्याअगोदर नवीन कनेक्शन दिल्यास आम्हाला ते काम बंद पाडावे लागेल, असा इशारा सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी दिला.
इन्सुली गावात महावितरणचे सबस्टेशन असूनही जर तुम्ही गावातील वीजपुरवठा करू शकत नाही तर अन्य गावात येथून लाईन का नेता? असा संतप्त सवाल सरपंच वेंगुर्लेकर यांनी केला. इन्सुली गावातील सबस्टेशनवरून दशक्रोशीतील तेथून अन्य गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र सबस्टेशन ज्या गावातील वीज ग्राहकांना काळोखात रहावे लागते. गेले चार दिवस तर मध्यरात्री वीज गायब होते. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी सरपंच वेंगुर्लेकर यांच्या नेतृवाखाली अभियंता श्री. ठाकूर यांना घेराव घातला.
आमच्या गावात सबस्टेशन असुन आम्हाला का काळोखात रहावे लागते? तुम्ही आणि तुमचे कर्मचारी कधीच फोन का उचलत नाही? सद्यस्थितीत इन्सुली सबस्टेशनमधून ओटवणे येथे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. जर तुम्ही इन्सुली गावात सुरळीत वीजपुरवठा देऊ शकत नाही. इन्सुलीला वेगळा फिडर देऊ शकत नाही तर तुम्ही इन्सुलीमधून अन्य गावांना का कनेक्शन देता? अश्या सवालांचा भडीमार ग्राहकांनी केला.आमच्या शेतकर्यांच्या जमिनी म्हणजे जशा तुमच्या मालकीचे आहेत तसेच तुम्ही खांब उभारत आहात. जर गावातील वीज समस्या सुटल्या नाहीत तर इन्सुलीवासीयांच्या प्रतिक्रियांना सामोरे जायची तयारी ठेवा, असा इशारा सरपंच वेंगुर्लेकर यांनी दिला.
गावात पावसाळा सुरू झाल्यापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. तक्रारीसाठी वीज कर्मचार्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाही. एवढा मोठा गाव असूनही केवळ दोन कर्मचारी आहेत. मग आम्ही दाद कोणाकडे मागायची? रात्री लाईट जाते आणि सकाळी येते मग लाईट बिल तरी आम्हाला माफ करा, अशी मागणी माजी उपसरपंच सत्यवान केरकर यांनी केली.
वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही रात्री अपरात्री आंदोलन करू, असा इशारा सचिन पालव यांनी दिला.
सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच बाळू मेस्त्री, नंदू पालव, देवस्थान समिती अध्यक्ष मनोहर गावकर, माजी उपसरपंच सत्यवान केरकर, नाना पेडणेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजेंद्र कोठवळे, संतोष मेस्त्री, पोलिसपाटील प्रिया कोठावळे, प्रभाकर गावडे, योगेश परब, सुभाष गावकर, संदेश पालव, नीलकंठ सावंत, आनंद मेस्त्री, विनय गावकर, प्रदीप कोठावळे, अमर गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी अभियंता श्री. ठाकूर यांनी येत्या आठ दिवसांत गावातील वीज समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच इन्सुली गावासाठी एक लाईनमन तत्काळ देण्याचे जाहीर केले. रात्रीच्या वेळी असनीये, तांबोळी, विलवडे भागात बिघाड होऊन लाईट गेल्यास सदर कर्मचारी बिघाडात दुरुस्ती होईपर्यंत प्राधान्याने इन्सुली गावातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करू, असे लेखी आश्वासन दिले.