ओरोस : कणकवली तालुक्यातील महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने मायनिंग व्यवसायिकांकडून हप्ता वसुली केला असून या जमलेल्या रक्कमेतील कोणाची किती टक्केवारी आहे ? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कणकवली तालुका महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याकडून गुरुवारी 23 जानेवारी रोजी मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणार्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वीस, पंचवीस, तीस, पन्नास पासून एक लाखापर्यंत हप्ता वसुली करण्यात आली. महसूल विभागाने कोणाच्या नावाखाली ही रक्कम गोळा केली. ही रक्कम कोणाला देण्यात येणार आहे? या अधिकार्याने एकूण किती रक्कम वसुली केली ? या जमलेल्या रक्कमेतील कोणाची किती टक्केवारी आहे? याची सखोल चौकशी करा. व त्याच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.