मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतिशील शेतकरी व नामांकित आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी संशोधनातून विकसित केलेल्या लाल शेवग्याच्या अभिनव वाणाला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले असून, हा कृषी क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. लाल शेवग्याच्या वाणाला अशा प्रकारचे पेटंट मिळण्याची ही जागतिक स्तरावरील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तम फोंडेकर हे गेली अनेक वर्षे आंबा उत्पादनासह शेवग्याच्या पिकावर संशोधन करत आहेत. हापूस आंब्याच्या उत्पादनात त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग करत बाजारात सर्वात आधी हापूस आंब्याची पेटी विक्रीसाठी आणण्याचा मान मिळवला असून, त्यासाठी जागतिक विक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. याच संशोधन वृत्तीमधून त्यांनी शेवग्याच्या पिकातही वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेत लाल शेवगा विकसित केला.
मोनो व डाय हायब्रीडमधून निर्मिती
लाल शेवग्याचा हा वाण मोनो हायब्रीड आणि डाय हायब्रीड पद्धतीच्या संकरणातून विकसित करण्यात आला आहे. पारंपरिक हिरव्या शेवग्याच्या तुलनेत रंग, आकार, चव आणि पोषणमूल्ये या सर्व बाबतीत हा वाण वेगळा ठरतो. या वाणाच्या पेटंटसाठी फोंडेकर यांनी नवी दिल्ली येथे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या तज्ज्ञ पथकाने दोन वेळा कुंभारमाठ येथे येऊन प्रत्यक्ष झाडांची, शेंगांची व उत्पादन क्षमतेची सखोल तपासणी केली. सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर हा प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्याकडे पाठवण्यात आला.अखेर जानेवारी महिन्यात कृषी विद्यापीठाकडून उत्तम फोंडेकर यांना लाल शेवग्याच्या वाणाचे अधिकृत स्वामित्व (पेटंट) प्रदान करण्यात आले.
लाल शेवग्याची वैशिष्ट्ये
लाल शेवग्याचा हा वाण पोषणमूल्यांच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. पारंपरिक शेवग्याच्या तुलनेत यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक, व्हिटॅमिन्स (विशेषतः व ) मोठ्या प्रमाणात, कॅल्शियम व खनिजे जास्त प्रमाणात आढळतात. या शेवग्याची शेंग दीड ते दोन फूट लांबीची असून, आतील गर मऊ व चवदार आहे. रंग लालसर असल्यामुळे भाजी, उसळ तसेच औषधी उपयोगासाठी याला विशेष मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्यदायी आहाराच्या दृष्टीने हा शेवगा मधुमेह, अशक्तपणा व पोषणतुटीच्या समस्यांवर उपयुक्त ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधी
लाल शेवग्याच्या वाणामुळे शेतकऱ्यांना भविष्यात चांगले उत्पन्न मिळण्याची संधी आहे. हा वाण व्यापारी शेतीसाठी उपयुक्त असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी निर्माण होऊ शकते. विशेषतः सेंद्रिय शेती, हेल्थ फूड आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रात या शेवग्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे.