वैभववाडी : दहावीच्या भुईबावडा केंद्रावर झालेल्या कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग व कोकण बोर्डाचे अधिकारी शुक्रवारी चौकशीसाठी भुईबावडा केंद्रावर दाखल झाले. त्यांनी बंद दाराआड केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, पर्यवेक्षक, स्टेशनरी कस्टडीयन यांची कसून चौकशी केली. ते आपला अहवाल लवकरच शिक्षण विभाग आणि कोकण बोर्डाला सादर करणार आहेत.
मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भुईबावडा केंद्रावरील गैरप्रकाराने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. एका विद्यार्थ्याच्या नऊ पेपरपैकी तब्बल सात पेपरच्या पुरवण्या अन्य व्यक्तीकडून लिहून घेतल्याचे बोर्डाने केलेल्या तपासात स्पष्ट झाले. या प्रकारात संबंधित विद्यार्थ्यांच्या शिक्षक असलेल्या वडिलांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याच्या ९ पैकी ७ विषयांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षरामध्ये बदल आढळला आहे. त्यामुळे त्यात कॉपी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीकडूनसुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
दहाजणांची स्वतंत्रपणे घेऊन चौकशी
शिक्षण समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी हा प्रश्न उपस्थित करून लावून धरला. यावेळी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय माने, तर कोकण बोर्डकडून निवृत्त शिक्षणाधिकारी डी. जी. साळुंखे, लिपिक गणेश भालेकर हे भुईबावडा केंद्रात सकाळी दाखल झाले. त्यांनी या परीक्षा केंद्रावर जबाबदार असणाऱ्या केंद्र संचालक, सहसंचालक, स्टेशनरी कस्टडीयन, संबंधित सुपरवायझर, रिलीव्हर अशा दहाजणांची स्वतंत्रपणे एक-एकाला बंद खोलीत घेऊन चौकशी केली आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता याबाबत आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज तपासणी
स्टेशनरी कस्टडीयन यांच्या ताब्यात असलेल्या पुरवण्या कॉपी लिहिणाऱ्या शिक्षकाकडे कशा गेल्या? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसेच परीक्षेदरम्यान बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत.