आडाळी एमआयडीसी येथे दिवसाढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने काढलेली माती. pudhari photo
सिंधुदुर्ग

आडाळी एमआयडीसी क्षेत्रात मायनिंगसदृश्य मातीची तस्करी!

Illegal soil mining: मायनिंग उत्खनन करून कोट्यवधी रुपयांची खनिज तस्करी

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग ः आडाळी एमआयडीसी क्षेत्रात जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली काही स्थानिक व माती दलालांनी मोठ्या प्रमाणात मायनिंगसदृश्य माती तस्करी सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरात या एमआयडीसी मधून कोट्यवधी रुपयांची मायनिंग तस्करी केल्याचे बोलले जात आहे.

मायनिंग तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असून महसूल व एमआयडीसीचे अधिकारी खरच गांधारीच्या भूमिकेत आहे का? की हे सर्व त्यांच्या वरदहस्ताने सुरू आहे? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. या मायनिंग उत्खननावर कारवाई होणार? की यातून प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यातील नवा आका जन्मास येणार? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील 25 गावात इको सेन्सिटिव्ह झोन असताना या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंग उत्खनन करून करून कोट्यवधी रुपयांची खनिज तस्करी केली जात आहे. आडाळी, मोरगाव परिसरात महसूल कडून बिनशेती जमीन करून आडाळी एमआयडीसीमधील मायनिंग त्या ठिकाणी डंपिंग करून ठेवले जाते व मध्यरात्रीच्या वेळी डंपरच्या साहाय्याने ते रेडी येथे नेले जाते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मायनिंगची तस्करी सुरु असताना महसूल विभागाला काहीच कसे दिसत नाही, महसूल विभाग गांधारीच्या भूमिकेत आहे का? असा सवाल आता सर्व स्तरातून विचारला जात आहे.

आडाळी एमआयडीसी मध्ये काढले जाणारे मायनिंग मोरगाव मधील बिनशेती व अ‍ॅग्रीकल्चर जमिनीत माती साठा करून ती रात्रीच्या वेळेस डंपरच्या साह्याने ट्रान्सपोर्ट केली जाते. मोरगाव मधील काही जमीन मालकांनी गोवा येथील खनिज तस्करांना आपल्या जमिनी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्या जमिनीमध्ये आडाळी एमआयडीसी मधील माती साठवून ठेवली जाते. दोडामार्ग-बांदा राज्य मार्गालगत मातीचे असे मोठमोठे ढिगारे सहज दिसून येत आहेत. मात्र महसूल विभाग या एकाही साठ्यावर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माती तस्करीला वरदहस्त कोणाचा?

आडाळी एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंग उत्खनन केले जात आहे. स्थानिक लोक जेसीबीच्या सहाय्याने हजारो टन माती दिवसाढवळ्या काढत आहेत. या प्रकल्पाचे अधिकारी किंवा महसूल विभाग या दिवसा ढवळ्या काढल्या जाणार्‍या मायनिंगवर का कारवाई करत नाही? या सर्व प्रकाराला कोणा बड्या राजकीय व्यक्तीचा तर हात आहे का? प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही मायनिंग तस्करी केली जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या माती तस्करीवर कारवाई होणार का? हे मात्र न उलगडणारे कोडे बनले आहे.

गतवर्षीचा सील केलेला मायनिंग साठा गायब

मोरगाव येथील एका खाजगी जागेत गतवर्षी अवैध मातीसाठा केला होता. खुले आम रस्त्यावर डंपर लावून ही माती रेडी येथे तस्करी केली जात होती. याची बातमी गतवर्षीच दै. पुढारीत येताच महसूल विभागाने त्याच्यावर कारवाई करीत मातीचा साठा जप्त केला होता. मात्र महसूलने सील केलेला हा मातीसाठा मायनिंग तस्करांनी यंदा रात्रीच्या वेळेत चोरून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT