Illegal Mining Pudhari
सिंधुदुर्ग

Illegal Mining Sindhudurg 2026 | सावंतवाडी, दोडामार्गात मायनिंगचा काळा बाजार

Illegal Mining Sindhudurg 2026 | सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंगचा काळाबाजार सुरू असून अधिकारी सुस्त आणि दलाल मस्त अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मळेवाड : सगुण मातोंडकर

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंगचा काळाबाजार सुरू असून अधिकारी सुस्त आणि दलाल मस्त अशीच परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत असून एक प्रकारे शासनाचे हे नुकसानच आहे. अधिकारी अशा वाहतुकीवर किंवा साठ्यावर कोणती कारवाई करत नसल्याने कुंपणच शेत खात असल्याचे दिसून येत आहे.

परिसरातील अनेक गावात मायनिंगला जोरदार विरोध होत असल्याने यामुळे प्रस्तावीत काही प्रकल्प रखडले आहेत. अधिकृत प्रकल्प लवकर सुरू होणे शक्य नसल्याचे लक्षात येताच मायनिंग दलालांना वेगळी शक्कल लढवायला सुरुवात केली. कवठणी येथे एका कंपनीने काही वर्षापूर्वी मायनिंगसदृश मातीचा साठा केला होता. तो साठा मायनिंगचा नसून साधी माती असल्याचा फार्स करत त्याची वाहतूक करण्यात केली. खरेतर सदर माती वाहतुकीसाठी कायदेशीर परवाना घेतला की नाही, हे पाहणे खनीकर्म अधिकाऱ्याचे कर्तव्य होते. कवठणी येथील माल कमी ग्रेडचा असून तो जास्त ग्रेडच्या साठ्यात मिक्स करून वापरला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

असा भेसळ करून तयार केलेल्या मालाची मग विक्री केली जाते. या सगळ्या प्रकारात अधिकारी मालामाल होतातच मात्र आपण ज्या सरकारी खात्यात काम करत आहोत त्या खात्यालाच डाग लागण्याचे काम काम हे अधिकारी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा या प्रकाराला आता आळा घालणे गरजेचे आहे. मायनिंग काळाबाजाराचा दुसरा प्रकार म्हणजे ज्याठिकाणी मायनिंग आहे अशा जागेत जमीन सपाटीकरण्याच्या नावाखाली मायनिंग सदृश्य माती इतरत्र नेऊन साठा करून ठेवली जाते.

काही दिवसांनी याच मातीवर रॉयल्टी चढवली जाते. मायनिंग वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर जीपीआरएस सिस्टिम अनिवार्य असते. असे असताना, आधी अवैध साठा करून मग कशी काय रॉयल्टी चढवून सदर अवैध माल अधिकृत केला जातो? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. अशा अवैध साठ्याच्या वाहतुकीसाठी खनिकर्म विभागाकडून पास दिले जातात. अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सगळा काळाबाजार केला जातो. हे पास नागपूर किंवा कोल्हापूर खाण विभागकडून दिले जातात. यामुळे सर्वसामान्य माणूस तिथं पर्यंत पोचू शकत नाही, सेटिंग लावून असे पास घेतले जातात.

काही दिवसांपूर्वी मळेवाड-जकातनाका येथे काही तरुणांनी अवैध मायनिंग वाहतूक रोखली होती. सदर खनीकर्म विभाग कोमात अवैध मायनिंग साठा असो किंवा वाहतूक, याबाबत जिल्हा खनिकर्म विभागाकडे आजपर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्या? किती प्रकरणात कोणती कारवाई झाली? किती दंड वसूल केला. याचे ठोकटाळा घेतला तर लक्षात येईल की हे खाते जिल्ह्यात असून नसल्यासारखे आहे.

एकंदरीत हे खाते कोमात आहे. या सर्व प्रकारावर आता कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माल दोडामार्ग-वझरे येथून रेडीकडे नेला जात होता. दोडामार्ग येथे सद्यस्थितीत कोणताही मायनिंग प्रकल्प सुरू नसताना हा माल आला कुठून? असा प्रश्न करण्यात आला. यावेळी महसूलच्या भरारी पथकाने ऑनलाईन पंचनामा केला असता सदर वाहतूक पास मुदतबाह्य असल्याचे लक्षात आले.

यानंतर सदर गाड्या जप्त करून त्या सावंतवाडी तहसील कार्यालयात नेण्यात आल्या. यानंतर महसूलकडून केवळ एका गाडीवर अवैध मातीची वाहतूक केल्याप्रकरणी दंड करण्यात आला. या गाड्यांच्या पासवर आणखीन एक दिशाभूल करणारी नोंद होते ती वजन काट्याची. या गाड्यांच्या पासवर नमूद वजन काटा कंपनी मालकाशी संपर्क केला असता त्याने आपल्या कंपनीचा वजन काटाच वापरला नसल्याचे सांगितले. यावरून वजन काटा एजन्सीचे नावे बोगस पास काढले जात असल्याचे सिद्ध झाले. मात्र खणीकर्म विभागाने अद्याप या प्रकराची चौकशी केल्याचे दिसून आलेले नाही. यावरून खणीकर्म विभागाचा कूर्मगती कारभार दिसून येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT