आपला कार्यकर्ता असला, तरी कारवाई
वाळू आणि ड्रग्ज माफियांना सोडणार नाही
कालचा फक्त ट्रेलर
कणकवली : गुरुवारी कणकवली शहरात मटका बुकी अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी पोलिस यंत्रणेला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. छापाप्रकरणी जबाबदारी निश्चित करून दोषी असलेल्या दोन ते तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई निश्चितपणे होईल. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर आपण सोडणार नाही. बेकायदेशीर धंदे जिथे सुरू आहेत, अशा ठिकाणी छापा सत्राचे 10 टार्गेट ठरवले असून, दर आठवड्यातून एकदा छापा टाकण्यात येईल, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. कणकवलीतील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तत्काळ बंद झाले पाहिजेत, या सर्व धंद्यांची खडान्खडा माहिती मला आहे. पोलिस, महसूल आणि संबंधित विभागाने गांभीर्याने या अवैध धंद्यांवर कारवाई न केल्यास मी स्वतः हे धंदे बंद करेन. दर आठवड्याला छापासत्राची ब्रेकिंग मिळेल. यापुढे जिल्ह्यात अवैध धंदे दिसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाईल.
मंत्री नितेश राणे म्हणाले, मी काय करू शकतो हे काल पोलिसांना दाखवून दिले. सिंधुदुर्गातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, पोलिस, महसूल आणि इतर विभाग काय काय करतात? वाळू चोरी, गांजा, गोवा बनावटीची दारू या अवैध धंद्यावाल्यांना कोण पाठबळ देते, याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. कालचा फक्त ट्रेलर होता, अजून खूप काही बाकी आहे. पालकमंत्री अवैध धंद्यांपर्यंत कसा पोहोचू शकतो, हे सर्वांनी पाहिले आहे. जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करा. प्रत्येक आठवड्याला धाड सत्र टाकून ते व्यवसाय कायमस्वरुपी बंद करणार, यात जे दोषी अधिकारी, कर्मचारी सापडतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.