Arms Racket Busted : माणगाव खोऱ्यात अवैध शस्त्र निर्मितीचे रॅकेट उघड; दोघांना अटक File Photo
सिंधुदुर्ग

Arms Racket Busted : माणगाव खोऱ्यात अवैध शस्त्र निर्मितीचे रॅकेट उघड; दोघांना अटक

गवारेडा-सांबराची शिंगेही जप्त, कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : माणगाव खोऱ्यात बेकायदेशीरपणे बंदुका तयार करणाऱ्या एका रॅकेटचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शनिवारी पहाटे केलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन बंदुका, शस्त्र निर्मितीचे साहित्य आणि संरक्षित वन्यजीवांची शिंगे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शांताराम दत्ताराम पांचाळ (वय ४१, रा. मोरे-मधलीवाडी) आणि आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय ३२, रा. माणगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मोरे येथील एक इसम घरीच बंदूक बनवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने शनिवारी पहाटे शांताराम पांचाळच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये दोन काडतुसी आणि एक ठासणीची बंदूक, दोन एअर गन, बंदुकांचे बॅरल, बट, जिवंत व रिकामी काडतुसे आणि शस्त्र निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख १७ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, त्याच्या घरात गवारेड्याचे आणि सांबराचे कवठीसहित शिंगही सापडले, ज्यामुळे या प्रकरणात शिकारीचाही संशय बळावला आहे.

पांचाळच्या चौकशीतून शस्त्र निर्मितीसाठी लागणारे साहित्य माणगाव येथील आप्पा धुरी पुरवत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यालाही ताब्यात घेतले. दोघांवरही भारतीय शस्त्र कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या रॅकेटची पाळेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यापर्यंत पसरली असल्याची शक्यता असून, पोलिसांचे एक पथक अधिक तपासासाठी रवाना झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्वतः कुडाळ पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणात आणखी काही जण सामील असण्याची शक्यता असून, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध देसाई अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT