नीलेश राणे 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Nilesh Rane | मालवणच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू

आ. नीलेश राणे; शहरातील विकासकामांचा घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

मालवण : 'स्वच्छ सुंदर मालवण शहर' या संकल्पनेतून मालवण शहरासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल. राज्य सरकार, अर्थसंकल्प तसेच नगर विकास खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अजूनही निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील असल्याचे आ. नीलेश राणे यांनी सांगितले.

मालवण नगरपरिषद येथे आ. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. आ. राणे यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर विकासकामांचा आढावा घेतला. मंजूर कामे, प्रगतीपथावर असलेली कामे, प्रस्तावित कामे अशा सुमारे ९० ते १०० कोटी निधीतील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. या विकास कामांसोबतच आणखीही २५ ते ३० कोटी विकास निधी मालवण शहरासाठी लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्त सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

मालवण शहर विकासासाठी राज्य शासन, नगरोत्थान, अर्थसंकल्पीय अधिवेशन, जिल्हा वार्षिक योजना यासह विविध योजनांमधील कोट्यवधी निधीतील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. मामा वरेरकर नाट्यगृह इमारत सुसज्ज आणि दर्जेदार करणे, घनकचरा व्यवस्थापन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रॉक गार्डन, नमो उद्यान, हिंदसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, मत्स्यालय, भाजी मार्केट इमारत, शहर सुशोभीकरण यासोबत नळपाणी योजना, भुयारी गटार योजना याही योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मागासवर्गीय वस्तीतील जमिनी नावे नसल्याने त्याठिकाणी निधी खर्च करताना अडचणी निर्माण होत असल्याबद्दल मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले. यावर शासन स्तरावर चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल असे आ. राणे यांनी सांगितले. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आ. राणे यांना अभिप्रेत शहर विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

नळपाणी योजना निश्चित वेळेत पूर्ण व्हावी

नळपाणी योजनेच्या कामात अनेक अडचणी निर्माण केल्या जात असल्याची माहिती मिळत आहे, यामुळे मुख्याधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून शहरवासीयांसाठी महत्त्वाची असलेली नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी सातत्याने काम पूर्ण होत असल्याचा अहवाल घ्यावा, महत्त्वपूर्ण अशी योजना लवकर पूर्ण व्हावी, असेही आमदार यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर

भटक्या कुत्र्यांच्या बाबत आ. राणे यांनी प्रशासनाला गांभीर्याने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सागरी महामार्गावरील तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेचे प्रवेशद्वार आकर्षक बनवा

नगरपालिका इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसन्न आणि आनंदी वातावरण वाटले पाहिजे. यामुळे तळमजला आणि त्यापरिसरातील व्यवस्था ही दर्जेदार बनविली पाहिजे. नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना याठिकाणी आल्यानंतर चांगल्या ठिकाणी आल्याचे समाधान वाटले पाहिजे. यामुळे प्रशासनाने प्रवेशद्वारावरील अडगळ आणि व्यवस्था सुस्थितीत करावी अशा सूचना आ. नीलेश राणे यांनी दिल्या.

घनकचरा व्यवस्थापन

शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी कचरा समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी एक परिपूर्ण आराखडा बनविणे आवश्यक आहे. पालिकेने नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावेत निधी उपलब्ध करून दिला जाईल, पण शहर विकासासाठी सर्वांनी काम करावे असेही त्यांनी सांगितले.

वाहतुकीच्या कोंडीवर पर्यायी मार्ग तयार करा

शहरात येण्यासाठी जो वेळ लागत आहे, तो कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांचा अभ्यास करून त्यावर कार्यवाही करावी. कुंभारमाठ येथून थेट देवबागमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अभ्यास करावा. तशाचप्रकारे शहरात येताना होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कोणालाही विस्थापित न करता पर्यायी मार्ग असलेल्या ठिकाणांचा अभ्यास करावा, अशी सूचना आमदारांनी केली.

नमो उद्यान आवश्यक

शासनाने नमो उद्यान योजनेतून तब्बल एक कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला आहे. शहरात नगरपालिकेची स्वतःची जागा नसल्याने हा निधी अखर्चित असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. या वर आ. राणे यांनी 'नमो उद्यान' या योजनेतून मिळालेला निधी आणि त्यानंतर उद्यान चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्यानंतर होणाऱ्या स्पर्धेतून मिळणारे ५ कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळणार नाही. यामुळे शहरातील इतर ठिकाणच्या जागांचा शोध घेऊन उद्यान प्रकल्प साकारणे आवश्यक आहे. आपण फक्त रॉक गार्डन या एकाच गोष्टी भोवती फिरत आहोत. रॉक गार्डन बरोबर पर्यटकांना इतरही ठिकाणी चांगली व्यवस्था होण्यासाठी उद्यान निर्माण होणे आवश्यक असल्याचेही आ. राणे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT