काहीही असो... लाडक्या बहिणींकडून दीड हजार रुपयांची वाट पाहिली जात असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 95 महिलांनी आम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेतील अर्थसहाय्य नको, असे शासनाच्या महिला व बालविकास विभागाला कळविले आहे. अशाही काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे पैसे अनेक कारणांनी थांबले आहेत अशा महिला मात्र सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात जातात आणि आपल्या पद्धतीने राग व्यक्त करत ‘शिव्या’ घालत निघून जातात.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या प्रभावी योजनेला आता पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. या बहुचर्चित योजनेचा मोठा प्रभाव गेल्या निवडणुकीवर पडला. पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येण्यास ही योजना महत्त्वाची ठरली. या योजनेसाठी राज्याच्या बजेटमधील जवळपास 40 हजार कोटी खर्च करावे लागणार असे सांगितले जाते. इतर अनेक योजनांमधील निधी वितरित न झाल्यामागे ही लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचा आरोपही केला जातोय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 93 हजार 200 महिला या योजनेचा लाभ घेतात. सरकार पातळीवर या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी सुरू असतानाच जिल्ह्यातील 95 महिलांनी या योजनेचा लाभ यापुढे नको, असे पत्र शासनाला सादर केले आहे. या योजनेचा लाभ नाकारण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. विशेषतः महाराष्ट्रात 9 हजार सरकारी कर्मचार्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. असे काही सरकारी कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आहेत. त्यापैकी काहींनी हा लाभ नाकारल्याचीही माहिती आहे. त्याशिवाय ज्यांच्या नावावर चारचाकी वाहने आहेत अशा काही महिलांनीही ‘या योजनेचा लाभ नको रे बाबा’ असे म्हटले आहे. काही 65 वर्षे वय असलेल्या महिलांनीही लाभ घेतला होता. अशापैकी काहींनी लाभ नको म्हणून सांगितले आहे. काही लाभार्थी मयत झाल्यामुळे त्यांच्या वारसांनी यापुढे लाभ देऊ नका, असे कळविले आहे. एकूणच या महिलांनी आताच प्रामाणिकपणा दाखवत पैसे नाकारले आहेत.
ही झाली एक बाजू... याची दुसरी बाजू अशी की राज्य शासनाने राज्य स्तरावरून या योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू केली आहे. त्यात अनेक अपात्र लाभार्थी सापडत आहेत. त्यात अगदी पुरुष लाभार्थी असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. अर्थातच जे अपात्र लाभार्थी आहेत, त्यांचे एकेक नाव या योजनेतून कमी होत आहे. अशी काही नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील आहेत. परंतु ती अपात्र नावे सिंधुदुर्गनगरी येथील महिला व बालविकास विभागाला कळविलेली नाहीत. त्याची कोणतीही माहिती त्या कार्यालयाकडे नाही. अशा अनेक महिला आहेत की त्यांना या योजनांचा लाभ बंद झाला आहे. ज्यांना खात्रीने वाटते की आपला लाभ बंद झाला आहे, म्हणजेच या योजनेतील बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही, अशा महिलांपैकी अनेक महिला ‘आपले पैसे बंद होणारच होते’ असे म्हणून आजवर मिळाले त्यावर समाधान मानून गप्प राहतात. काही लाडक्या बहिणी मात्र सिंधुदुर्गनगरीतील कार्यालय गाठतात. तेथील अधिकारी, कर्मचारी यांना भेटून पैसे येणे का बंद झाले याची विचारणा करतात. तिथे आधारकार्ड दिले की व्यक्तिगतरित्या त्यासंबंधीची माहिती मिळते. पैसे का बंद झाले त्याचे कारण समजते. काहीवेळा एकाच रेशनकार्डवरील दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असतो.
विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये आपोआपच सर्वजणांचे पैसे बंद होतात. अशावेळी कार्यालयात आलेली एखादी लाडकी बहीण त्रागा करते. आपल्याच कुटुंबातील इतर लाभार्थीला त्यासाठी कारणीभूत ठरवते किंवा सरकारवर राग व्यक्त करते. कर्मचारी किंवा अधिकारी काहीच बोलत नाहीत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसते. मग अशा लाडक्या बहिणी त्रागा करून निघून जातात.
जेव्हा ही योजना आली तेव्हा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी दिली. त्यांच्याकडे आलेले अर्ज भरून पाठविले. बहुतांश लोकांना त्याचा लाभ सुरू झाला. आता पडताळणी सुरू झाली आहे. अंगणवाडी सेविका पडताळणीच्या कामासाठी मात्र सहज राजी नाहीत. कारण त्यासाठी लोकांचा रोष सहन करावा लागणार आहे. सध्यातरी शासन त्यांच्याकडे असलेल्या तपशीलानुसार पडताळणी करत आहे. हळूहळू ही पडताळणी मोहीम गावापर्यंत पोहोचू शकते, अशी शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनादिवशी पुढील हप्ता मिळणार असल्याचे महिला व बालविकास खात्याच्या मंत्र्यांनी जाहीर केले आहे. ज्यांना हा हप्ता बँकेत जमा होईल त्या लाडक्या बहिणी निश्चितच खूश होतील; मात्र ज्यांना मिळणार नाही त्या लाडक्या बहिणी मात्र सत्तेतल्या भावांवर नाराज होतील हे नक्की!