मळगाव : मातोंड व होडावडे गावांना जोडणारा सुभाषवाडी बंधारा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धकेले होते. या वृत्तामुळे जाग आलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा फलक लावून अवजड वाहनांना प्रतिबंध केला .
मातोंड व होडावडा पंचक्रोशीला जोडणारा होडावडे-सुभाषवाडी ब्रीजकम बंधारा जार्ण झाल्याने वाहतुकीस धोकज्ञादायक बनला आहे. सुमारे 40 वर्षे हा जुना बंधारा पूल शासनाने निर्लेखित करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र या ठिकाणी नवीन पूल मंजूर न केल्याने अद्यापहा जुना बंधारा पूल वापरात आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी नाईजास्तव जीव धोक्यात घालून या पुलाचा वापर करत आहेत.
या ब्रीजकम बंधार्यावरून मातोंड, पेंडूर, पाल, अणसूर, धाकोरे, आजगाव, टाक, शिरोडा गावातील नागरिकांची रहदारी असते. मातोंड पंचक्रोशीतील शेतकरी होडावडा आठवडा बाजारासाठी तसेच कुडाळ व सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. दरम्यान पावसाळ्यात होडावडा नदीला येणार्या पुरामुळे या सुभाषवाडी ब्रीजकम बंधार्याच्या भिंतींची मोठ्या प्रमाणात झीज होऊन त्;या कमकुवत झाल्या आहेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून दिल्यानंतर जि. प. बांधकाम विभागाने हा सुभाषवाडी ब्रीजकम बंधारा निर्लेखित करण्याचे आदेश बजावत शासकीय सोपास्कार पूर्ण केले. त्या ठिकाणी नवीन पूलही प्रस्तावित केला. मात्र प्रत्यक्षात या पुलासाठी निधीची तरतूद झालेली नाही. परिणामी पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थी जीव मुठीत धरून या बंधार्यावरून ये -जा करत आहेत.
या बंधार्यावरून अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू आहे. यामुळे हा धोकादायक बंधारा कधीही कोसळून जीवघेणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय या ब्रीजकम बंधार्याला जोडणार्या मातोंड मुख्य रस्ता ते होडावडा मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत तसेच रस्त्यावरील मोरी खचली आहे. त्यामुळे बंधार्यासह बंधार्याला जोडणारा रस्ताही धोकादायक बनला आहे.
या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने बंधार्यावर पुलाची उभारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत ‘नव्या पुलाची केवळ घोषणा, जुन्या बंधार्यावरून प्रवास जीवघेणा’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीमध्ये होडावडा-सुभाषवाडी ब्रीजकम बंधार्याची बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जाग आली. मातोंड व होडावडा या मार्गावरील बंधार्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांना बंदी असल्याचा फलक लावून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध आणला आहे.