कुडाळ : शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार 24 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येत आहेत. सायं. 4 वा. कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेने कुडाळ मध्ये झेंडे तसेच बॅनर्स लावून शक्तिप्रदर्शन केले आहे. ओरोस पासून कुडाळ पर्यंत मुंबई - गोवा महामार्गावर धनुष्यबाण चिन्ह असलेले शिवसेनेचे झेंडे लावल्याने महामार्ग भगवामय झाला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे आ. दीपक केसरकर आणि आ. नीलेश राणे निवडून आले आहेत. यानिमित्त मतदार आणि जनतेचे आभार मानण्यासाठी श्री. शिंदे गुरुवारी जिल्हा दौर्यावर येत आहेत.
कुडाळ येथे जाहीर आभार सभेला ते संबोधित करणार आहेत. गुरुवारी सायं. 4 वा. कुडाळ येथील नवीन एसटी डेपो मैदानावर त्यांची ही आभार सभा होणार असून त्यासाठी जिल्हा शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम व वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
ना.शिंदे यांचे सिंधुदुर्गनगरी येथे पोलिस परेड मैदान हेलिपॅडवर आगमन होणार आहे. तेथे त्यांचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर कुडाळ येथे सभास्थळी जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेने सिंधुदुर्गनगरी ते कुडाळ अशी जोरदार वातावरण निर्मीती केली आहे.
ठिकठिकाणी ना.शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसेच सिंधुदुर्गनगरी पासून कुडाळ काळपनाका पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर धनुष्यबाण चिन्ह असलेले शिवसेनेचे झेंडे लावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. कुडाळ येथे होणार्या सभेत ना.शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.