वैभववाडी ः हेत-किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणाला धरणाच्या पायथ्यापासून अतिरिक्त पाणीपुरवठा योजना करण्याचे लेखी आश्वासन कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांनी धरणग्रस्तांना दिले. त्यानंतर गेले चार दिवस धरणाचे बंद पाडलेले काम सुरू करण्यास धरणग्रस्तांनी सहमती दिली.
अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील हेत-किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील पिण्याचे पाणी व गावठाणातील अपूर्ण नागरी सुविधा याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांनी सोमवार 19 मे पासून धरणाच्या दरवाजाचे काम रोखून धरले होते. जोपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही. तसेच पुनर्वसन गावठाणातील प्रलंबित प्रश्नांबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत धरणाचे काम करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत गेले चार दिवस धरणाचे काम रोखून धरले होते. पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अभय मगरे, कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी धरणग्रस्तांची भेट घेऊन काम सुरू करण्यास द्यावे, अशी विनंती केली होती.
मात्र, जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत काम करू देणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील, कार्यकारी अभियंता हर्षल यादव, उपभियंता अभय मगरे यांनी धरणावर येऊन धरणग्रस्तांशी चर्चा केली .
यावेळी धरणग्रस्तांनी पुनर्वसन गावठाणातील समस्यांचा पाढा वाचला. शासनाने सन 2019 साली आमच्यावर अन्याय करत घळभरणी केली. घाईगडबडीत 2019 साली हेत-किंजळीचा माळ येथे आमचे पुनर्वसन केले. पुनर्वसन गावठाणातील सर्व नागरिक सुविधा पूर्ण करण्याचेे आश्वासन दिले. मात्र पुनर्वसन होऊन पाच-सहा वर्षे झाली तरी पिण्याच्या पाण्यासारखा मूलभूत प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत. पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण आहेत.
गावठाणात सर्वांना भूखंड मिळालेले नाहीत. पुनर्वसन गावठाणाला महसुली गावाचा दर्जा दिलेला नाही, आदी तक्रारी मांडल्या. यावर उत्तर देतांना अधीक्षक अभियंता श्री.पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पायथ्यापासून पाणीपुरवठा करण्यात येईल. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा प्रधान्यक्रम देऊन सोडवण्यात येतील.
तुमचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी खातेनिहाय बैठक घेऊन ते प्रश्न सोडविण्यात येथील, असे आश्वासन दिले. त्यानंतर गेले चार दिवस बंद असलेले धरणाचे काम सुरू करण्यास धरणग्रस्तांनी सहमती दिली. अधीक्षक अभियंता यांनी हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावाठाणाला भेट देऊन गावठाणातील समस्या धरणग्रस्तांकडून जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत आश्वासित केले.