दोडामार्ग ः तिलारी परिसरात वावरणाऱ्या जंगली हत्तींचा कळप ऐन भात कापणी हंगामात पुन्हा हेवाळे परिसरात दाखल झाला आहे. दीड -दोन महिन्यांपूर्वी हा कळप चंदगड तालुक्यात निघून गेला होता. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी सुटेकेचा निश्वास टाकला होता. मात्र हे हत्ती पुन्हा तिलारी खोऱ्यात परतल्याने दशक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे च चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिलारी खोऱ्यात हत्तींचा वाव गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढला आहे. पावसाळी हंगामात हत्तींचा कळप तिलारी खोऱ्यात धुडगूस घालत होता. अखेर सप्टेंबरच्या मध्यावर हा कळप चंदगड तालुक्यात गेला होता. त्यामुळे शेतकरीही निर्धास्त झाले होते. भातकापणी निर्धोक करता येईल, या विश्वासात शेतकरी होते. मात्र, शनिवारी रात्री पुन्हा चार हत्तींचा कळप हेवाळे गावाच्या हद्दीत दाखल झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या कळपात एक मोठी मादी हत्ती, एक लहान मादी आणि दोन पिल्लांचा समावेश असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हे हत्ती रविवारी हेवाळे गावातील उमाजी देसाई यांच्या घरामागील परिसरात फिरताना दिसून आल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. हत्तींच्या या अचानक पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली आहे. यंदा पावसाचा हंगाम लांबल्याने भात कापणी आधीच उशिरा सुरू झाली आहे. त्यात आता हत्तींचा धोका वाढल्याने भात नुकसानीबरोबरच हत्तींच्या हल्ल्याचे भय निर्माण झाले आहे.
अवकाळी पावसाचे अस्मानी संकट थोडं कमी झाले असताना आता हत्तींच्या रूपाने दुसरे संकट येथील शेतकरी व ग्रामस्थांसमोर निर्माण झाले आहे. भातपिक शेतात उभे आहे. हत्ती कधीही येतील व पिकलेली भातशेती तुडवून व खाऊन उध्वस्त करतील, याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने या हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा. तसेच हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.