Heavy rainfall in Sindhudurg
कुडाळ तालुक्यातील नदीकाठच्या भागातील भातशेती सतत पुराच्या पाण्याखाली असून, शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

जिल्ह्यात धो-धो सुरूच

पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात धो-धो कोसळणार्‍या पावसाचा जोर सोमवारी सलग चौथ्या दिवशीही कायम राहिला. त्यामुळे नदी किनारील भागात निर्माण झालेली पूरस्थिती जैसे थे आहे. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कविलकाटे, भैरववाडी, काळपनाका, पावशी शेलटेवाटी, बोरभाटवाडी, खोतवाडीसह नदीकिनारील भागांत घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. पूरबाधित भागातील नागरिकांनी संपूर्ण रात्र पुराच्या छायेत जागून काढली. जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांनी कुडाळ तालुक्यातील पूरबाधित भागांना प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेत, संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या आहेत.

आंबेरी पुलावरून गेल्या रविवारी वाहून गेलेल्या दत्ताराम भोई यांचा मृतदेह सोमवारी एनडीआरएफच्या पथकाला सापडला. मालवण भूतनाथ-तेलीवाडी येथेही अनेक घरांना पाण्याचा वेढा आहे. दरम्यान, दोडामार्ग तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सोमवारी सकाळ पहाटेपासून सुरू झाला आहे. धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू झाला असून, 51.69 क्युसेक (घ.मी. प्रतिसेकंद) पाणी बाहेर पडत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

कुडाळ भंगसाळ (कर्ली), पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे हातेरी नदी, हुमरमळा पिठढवळ नदी व माणगांव निर्मला नदी दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांच्या पुराचे पाणी नदीकाठच्या भागात शिरले आहे. रविवारी दुपारपासून शहरातील हॉटेल गुलमोहरसमोरील मुख्य रस्ता आणि सिद्धीविनायक हॉल समोरील रेल्वेस्टेशन-बांव रस्ता पाण्याखाली आहे. सोमवारीही या दोन्ही रस्त्यांवर पाणी असल्याने वाहतूक बंद होती.

कविलकाटे येथेही सलग दोन दिवस रस्त्यावर पाणी आहे. त्यामुळे वाहतूक बंद असून नागरिक व शालेय मुलांची गैरसोय झाली. नदीकिनारील भागात पुराच्या पाण्याने दिलेला वेढा कायम होता. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पूरबाधित भागातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. तर काही नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. नदीकिनारील कुडाळ, पावशी, कविलकाटे, बांव, बांबुळी, सरंबळ, चेंदवण, वेताळ बांबर्डे, पणदूर, हुमरमळा यासह अन्य भागातील भातशेती सतत पाण्याखाली जात असून, शेती कुजली आहे. तर लावणी केलेली शेती वाहूनही गेली आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रात प्रचंड प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

कुडाळातील पूरबाधित भागात रविवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देत आढावा घेतला. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव दिवसभर पूरस्थितीवर लक्ष ठेवून होते. पावशी शेलटेवाडी, पावशी हायवे, वेताळबांबर्डे, डिगस रूमडगाव, ओरोस, वर्दे आदी भागात जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. रात्री वर्दे येथील एका कुटुंबातील सहा सदस्यांना प्रांताधिकारी काळुसे, तहसीलदार वसावे, आढाव यांच्या उपस्थितीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

अखेर माणगावातून वाहून गेलेला मृतदेह सापडला

कुडाळ भंगसाळ नदीपात्रात पावशी-शेलटेवाडीच्या बाजुला रविवारी एक अज्ञात मृतदेह पुरातून वाहून आल्याचे तेथील स्थानिक ग्रामस्थांना दिसला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासह सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकाने हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी दिली. रविवार 7 जुलै रोजी आंबेरी पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेले दत्ताराम लाडू भोई यांचाच तो मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

SCROLL FOR NEXT