Heavy rains in Sindhudurg Mahavitaran 21 lakh loss
सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने तारा आणि पोल तुटून वीज वितरण कंपनीचे तब्बल २१ लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका ६९ गावातील तब्बल ४३ हजाराहून अधिक ग्राहकांना बसला आहे. याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
२० ते २२ मे या तीन दिवसांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोल पडणे, विजेच्या तारांवर झाड पडणे आदी कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यात दोन उपकेंद्रे बाधित झाली आहेत. तर १६ ठिकाणी उच्च दाबवाहिन्या बाधित झाल्या आहेत.
२६ ठिकाणी लघुदाब असलेले पोल तर ५९ ठिकाणी उच्च दाब असलेले बोल पडले आहेत, तर ४०३ ट्रान्सफार्मर खराब झाले आहेत. एकूण या अवकाळी पावसामुळे तब्बल ६९ गावांना त्याचा फटका सहन करावा लागला आहे. पडलेले पोल आणि वीज वाहिन्या पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीची यंत्रणा कार्यरत आहे. लवकरच यात सुधारणा होईल, असा दावा वीज कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात सकाळपासून पावसाची संतत धार सुरूच आहे, कणकवली तालुक्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. पडणाऱ्या पावसाचा जोर पहाटेच्या सुमारास वाढलेला पाहायला मिळत आहे. गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ होत आहे.
दरम्यान आज सिंधुदुर्गात अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर किणारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.