पावसामुळे आचरा-हिलेवाडी येथील शिवापूर बंधाऱ्याचा भाग वाहून गेला. file photo
सिंधुदुर्ग

आचरा, चिंदर परिसरात पावसाचे धूमशान!

पुढारी वृत्तसेवा

आचरा : आचरा परिसरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश्य कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आचरा व आजूबाजूच्या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. पाण्याच्या वेगामुळे आचरा-हिलेवाडी येथील शिवापूर बंधाऱ्याचा मधला भाग वाहून गेल्याने दोन भाग झाले आहेत. तर आचरा, गाऊडवाडी, चिंदर सडेवाडी, वायंगणी गावांतील पाटवाडी, बौद्धवाडी येथील परिसर पूर्णतः जलमय झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले, त्यामुळे काहींना स्थलांतरित व्हावे लागले.

हिर्लेवाडी, गाऊडवाडी परिसरात सकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसामुळे सुमारे १ कोटी २५ लाखांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. कुडाळ, मालवण-काळसे, बागवाडी येथील पूरस्थिती ओसरली असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दरम्यान, माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावरून वाहून गेलेला शेतकरी दत्ताराम लाडू भोई यांचा अद्याप शोध लागलेला नाही. जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा 'ग्रीन अलर्ट' राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

आचरा-गाऊडवाडी, हिर्लेवाडी, वायंगणी परिसर जलमय

आचरा परिसरात सोमवारी रात्री तौक्तेसारखी स्थिती निर्माण झाली होती. आचरा, चिंदर सडेवाडी, वायंगणी भागात सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे गाऊडवाडी भागात ग्रामपंचायत परिसर पूर्णतः जलमय बनला होता. याचा फटका हिर्लेवाडी भागालाही बसला. आचरा-गाऊडवाडी येथे रात्री ८ वा. पासून पाणी वाढू लागल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. रात्री पाण्याचा वेग वाढत होता. रस्त्यावर तीन फुटाच्या वर पाणी वाढले होते. हिर्लेवाडीमध्ये पाण्याचा जोर असून ग्रामस्थांना बाहेर येणे जाणे कठीण बनले आहे. आचरा गाऊडवाडी येथील सायमंड फर्नाडिस, जाकारीयस फर्नाडिस, बेन्तू फर्नांडिस, सिल्वेस्टर फर्नाडिस, पीटर फर्नाडिस, साल्वादर मिरिन्डा, लँन्सी फर्नाडिस आदिसह सर्व खिचनवाडीतील घरात पाणी घुसल्याने येथील काहींनी लगतच्या स्लॅबच्या घराचा आसरा घेतला होता.

चिंदर-सडेवाडी भागाला फटका

मुसळधार पावसाने चिंदर-सडेवाडी परिसरालाही फटका बसला. येथील बच्चू सरगुरू यांच्या गाड्यांमध्ये पाणी घुसल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर सुधीर मसुरकर यांच्या घरात पाणी घुसले होते. मंगळवारी मंडल अधिकारी अजय परब, तलाठी संतोष जाधव, पोलिसपाटील जगन्नाथ जोशी यांनी पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT