कणकवली ः बाजारात विक्रीसाठी आलेला शेवटच्या टप्प्यातील हापूस. pudhari photo
सिंधुदुर्ग

‘हापूस’चा हंगाम अंतिम टप्प्यात; दर आवाक्यात

Hapus mango: सध्या फळाच्या आकारमानानुसार प्रति डझन 300 ते 500 रु.दर

पुढारी वृत्तसेवा
कणकवली ः उमेश बुचडे

यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन कमालीचे घटलेले असतानाच आता शेवटच्या म्हणजेच तिसर्‍या टप्प्यातील आंबा बाजारात आला आहे. मार्केटमध्ये आंब्याचा दर सध्या फळाच्या आकारमनानुसार प्रति डझन 300 ते 500 रु. आहे. आता जेमतेम पुढील 8 दिवसच हापूस आंबा बाजारात उपलब्धता होईल, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. तर आंबा बागांमधून झाडांवर आंबा शिल्ल्लक नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हापूसचा या वर्षीचा हंगाम आता संपत आला आहे.

पहिल्या टप्प्यातील 90 टक्के मोहर वाया

या वर्षी ढगाळ वातावरण, पाऊस, थंडीचा अभाव याचा मोठा परिणाम आंबा उत्पादनावर झाला. नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये आलेला 90 टक्के मोहर प्रतिकूल हवामानामुळे वाया गेला. दुसर्‍या टप्प्यात जानेवारी महिन्यात आलेल्या मोहराचा आंबा एप्रिल महिन्यात एकदम तयार झाल्याने आंबा काढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. परिणामी तयार सर्वच आंबा काढणे शक्य झाले नाही, यामुळे काही ठिकाणी कलमांवरच तयार झालेला आंबा गळून जमिनीवर पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले. शिवाय एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये आल्याने आंब्याचे दर कमालीचे घसरले. 5 डजनच्या पेटीला केवळ 1000 ते 1500 रूपये दर मिळाला, अशी गंभीर स्थिती बागायतदारांवर आली.

तिसर्‍या टप्प्यातील आंबा संपला

दुसर्‍या टप्प्यातील आंब्याला स्थानिक बाजारपेठेत प्रतवारीप्रमाणे सुरूवातीला डझनी 1 हजार तर त्यानंतर 700, 500 रू. असा दर मिळाला. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारपेठेत आंबा मोठ्या प्रमाणात होता. मात्र आता तिसर्‍या टप्प्यातील आंबाही संपल्याने स्थानिक बाजारपेठांमध्येही आंबा कमी झाला आहे. तर तिसर्‍या टप्प्यातील आंबा तुरळक असल्याने आंबा हंगाम लवकरच संपला असल्याचे बागायतदार सांगतात.

चाकरमान्यांचा हिरमोड

यावर्षी आंब्याचे घटलेले उत्पादन, मुंबई, वाशी मार्केटमध्ये आंब्याचे कमालीचे घसरलेले दर यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सुट्टी असल्यामुळे पर्यटक, चाकरमानी मंडळी गावात येतात. मात्र त्या प्रमाणात आंबा उपलब्ध नसल्याने खास हापूस आंबा खरेदी करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांनाही मे महिन्यात आंबा किती उपलब्ध होईल हे सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे.

आंबा हंगाम संपत आल्याने आंबा विक्री दुकाने बंद

आंबा विक्री दुकाने गेले दोन महिने सुरू होती. त्यांनी आंबा हंगाम संपल्याचे समजताच दुकाने देखील बंद केली आहेत.

आंब्याचे उत्पादन 25 ते 30 टक्केच

यावर्षी आंब्याचे उत्पादन 25 ते 30 टक्केच झाले. त्यातील दुसर्‍या टप्प्यातच आंबा जास्त प्रमाणात झाला. मात्र तोही आंबा आता संपला असून तिसरा टप्प्यातील आंबा आता संपण्याच्या मार्गावर आहे तिसर्‍या टप्प्यातील आंबा हा 10 मे ते 27 मे पर्यंत असतो. मात्र तो आंबाही तुरळक असल्याने आंबा हंगाम लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT