सिंधुदुर्ग : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांतील घराघरांत श्री गणरायाची थाटात प्रतिष्ठापना करण्यात आली. आता संपूर्ण कोकणात उत्साह आणि भक्तिभाव याचा संगम पाहायला मिळत आहे. गणपतीसाठी मखरांची आकर्षक सजावट पाहायला मिळते आहे. मुंबई-गोवा महामार्गाने गावाकडे निघालेले मुंबईकर चाकरमानी दुपारनंतरही आपल्या घराकडे पोहोचताना दिसत होते.
यावर्षीचा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आल्यामुळे थोडा पाऊसही कमी आहे आणि मुंबईकर चाकरमान्यांनाही गावी येण्याचे नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी गावी आले आहेत. गेल्या अनेक वर्षांप्रमाणेच बिचाऱ्या चाकरमान्यांना वीस-वीस तास प्रवास यावर्षीही करावा लागला आहे. कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या सुटल्या, याशिवाय पालकमंत्री नितेश राणे यांनी मोदी एक्स्प्रेस सोडली. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.
बंद घरेदारे पुन्हा उघडली
गावागावांमधील तीस ते चाळीस टक्के घरे इतर वेळी बंद असतात. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या चाकरमान्यांनी ही घरेदारे उघडली आहेत. प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी दिसत आहेत. विशेष म्हणजे काही चाकरमानी दोन-तीन दिवस अगोदर आले होते. मुंबईतील नोकरीची रजा मर्यादित असल्यामुळे श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही चाकरमान्यांनी लगेचच मुंबईकडचा परतीचा प्रवास सुरू केला आहे.