देवगड : दीपाेत्सवामुळे तेजाेमय झालेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर.   (छाया : वैभव केळकर)
सिंधुदुर्ग

Kunkeshwar Temple Deepotsav | कुणकेश्वर शिवतीर्थावर २१ हजार दिव्यांचा दीपोत्सव

पुढारी वृत्तसेवा

देवगड : दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील मंदिर परिसरात २१ हजार दिवे प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला मंदिर परिसर, आकर्षक विद्युत रोषणाई, मनमोहक रांगोळ्या आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील यामुळे संपूर्ण शिवतीर्थावर दीपावलीचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

या दीपोत्सवाचे उद्‌घाटन माजी सरपंच विश्वास भुजबळ, प्रमुख अतिथी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध रंगांच्या दिव्यांनी सजलेला मंदिर परिसर आणि सुंदर रांगोळ्यांनी सजलेले प्रांगण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठी आकर्षण ठरावे, यासाठी नरकासुराचा प्रतीकात्मक पुतळाही उभारण्यात आला होता. या सजावटीच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह सेल्फी आणि छायाचित्रे काढताना दिसत होते.

दीपावली पाडव्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेली 'स्वर आनंदधन' संगीत मैफल. या संगीत कार्यक्रमाला देवगड तालुक्यातील असंख्य रसिक श्रोत्यांनी उपस्थिती लावली. संगीत मैफिलीमध्ये कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय गीताचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली. त्यांच्या गायनामुळे संगीत मैफिलीला विशेष रंगत आली. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, देणगीदार आणि सहकाऱ्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, माजी सरपंच महेश ताम्हणकर, उपाध्यक्ष गणेश वाळके, शशिकांत लब्दे, संजय वाळके आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT