तळाशील : गोपाळकृष्ण मंदिरानजीक शासनाने खाडीकिनारी दगडी बंधारा बांधला आहे. मात्र, वाळू उत्खननासाठी हा बंधारा जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आल्याचे रेवंडी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : शासकीय बंधारा फोडून वाळूचे अवैध उत्खनन

रेवंडी ग्रामस्थांचा तळाशीलमधील 'त्या' गटावर गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

मालवण : तळाशील येथील काही व्यक्तींकडून स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाने बांधलेला दगडी बंधारा जेसीबीच्या साहाय्याने फोडून वाळूचे उत्खनन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रेवंडी आणि तळाशील ग्रामस्थांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असून रेवंडी ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे प्रशासनाकडे बंधाऱ्याची मागणी करायची आणि दुसरीकडे आहे तो बंधारा फोडायचा, हा दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही," असा इशारा रेवंडी ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

तळाशील येथील गोपाळकृष्ण मंदिरानजीक शासनाने खाडीकिनारी दगडी बंधारा बांधला आहे. मात्र, वाळू उत्खननासाठी हा बंधारा जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आल्याचे रेवंडी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. धक्कादायक बाब म्हणजे, या बंधाऱ्याचे दगडदेखील चोरीला गेले आहेत. या कृत्यामुळे भरतीचे पाणी गावात घुसून विहिरींचे पाणी खारट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रेवंडी ग्रामस्थांनी या प्रकरणासाठी तळाशील येथील संजय केळुसकर आणि त्यांच्या साथीदारांना जबाबदार धरले आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आ. नीलेश राणे आणि प्रशासनाकडे बंधाऱ्यासाठी मागणी करायची, खाडीत उतरून आंदोलनाचे नाटक करायचे आणि स्वतःच शासकीय मालमत्तेचे नुकसान करायचे, हा प्रकार संतापजनक आहे. संजय केळुसकर हे स्वतः मान्य करतात की तळाशील गाव रेवंडीवर अवलंबून आहे, मग गेल्या काही दिवसांपासून रेवंडी गावाची बदनामी का केली जात आहे? असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. केवळ काही हातावर मोजण्याइतक्या लोकांमुळे संपूर्ण तळाशील गाव चुकीच्या मार्गावर जात असून दोन्ही गावांत वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

आजवर कोणावर वैयक्तिक आरोप नको म्हणून आम्ही गप्प होतो. मात्र, आता यापुढे तळाशीलमधील सर्वच अनधिकृत गोष्टींचा कायदेशीर पंचनामा आम्ही करू असा इशारा रेवंडी ग्रामस्थांनी दिला आहे. रेवंडी ग्रामस्थ लवकरच संबंधित शासकीय विभागाकडे या प्रकरणाची लेखी तक्रार करणार आहेत. फोडलेल्या बंधाऱ्याची तात्काळ पाहणी करून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच, तळाशील खाडी किनारपट्टीवर जिथे जिथे बंधाऱ्यांची नासधूस झाली आहे, त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT