पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

पुणे-हवेली येथील एक ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे पावणेतीन लाखाच्या गोवा मद्यासह चारचाकी वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण ६ लाख ३१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुणे येथील वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शनिवारी (दि. २५) जुन्या पत्रादेवी–बांदा मार्गावरील आरोसबाग तिठ्याजवळ करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे इन्सुली तपासणी नाका पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती. सायंकाळी ४ वा.च्या सुमारास एका चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, वाहनाच्या मागील सीट व डिकीत लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे २५ बॉक्समधील २१२ बाटल्या आढळून आल्या.

जप्त मद्याची किंमत २ लाख ८१ हजार ७६० रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असून, एकूण ६ लाख ३१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महेंद्र कैलास कोतवाल (३६, रा. हनुमानवाडी, असतापूर, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी तसेच संदीप कदम, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी आणि सतीश चौगुले यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT