सावंतवाडी : पोलिसांनी माजगाव-गरड येथे कारवाई करत अर्टिगा कारमधून 57 हजार 600 रुपयांची गोवा दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोल्हापूर-हातकणंगले येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रविवारी संध्याकाळी 6.30 वा.ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर पासिंगच्या अर्टिगा कारमध्ये वाहनाच्या सीट कव्हरखाली कप्पे करून गोवा दारूच्या 144 बाटल्या लपवून त्याची अवैध वाहतूक केली जात होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी माजगाव- गरड येथे सापळा रचला व कारची तपासणी केली असता त्यात गोवा दारू आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी कारही जप्त केली आहे. याप्रकरणी महेश आप्पा पाटील (35) व रोहन मानसिंग केंगारे (31 दोन्ही ,रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पो नि. अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.पंकज शिंदे, पोलिस हवालदार प्रवीण वालावलकर, पो. अनिल धुरी, पो. महेश जाधव यांच्या पथकाने केली.