सावंतवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे सावंतवाडी-आंबोली रस्त्यावर सापळा रचून आलिशान एसयूव्ही कारवर कारवाई करत 1 लाख 67 हजार 400 रुपयांची गोवा दारू जप्त केली.
या कारवाईत 10 लाखांची आलिशान कार ताब्यात घेतली असून पोलिसांनी याप्रकरणी अजित सुखदेव जगताप (रा. मोहोळ, जि. सोलापूर) व पुंडलिक नामदेव बाबर (रा. पंढरपूर) या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.
या कारवाईत गोवा बनावटीची अवैध दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली आलिशान कार असा एकूण 11 लाख 67 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहा. पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलिस अंमलदार अमर कांडर, महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.