दोडामार्ग : दोडामार्ग चेक पोस्ट येथे गोवा दारू वाहतुकीवर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे कारवाई केली. या कारवाईत एकूण 48 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित अभिषेक काशीनाथ राठोड व विकास चंदू चव्हाण (दोघेही रा. कुडगी तांडा, ता. बसवन- बागेवाडी, जि. विजापूर ) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ)(ई), 81, 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
संशयित अभिषेक राठोड व विकास चव्हाण हे दोघेही शुक्रवारी पहाटे हिरो स्प्लेंडर दुचाकीने गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत होते. महाराष्ट्र व गोवा राज्य सीमेवर तैनात पोलिसांनी त्यांची दुचाकी तपासणीसाठी थांबवली. यावेळी त्यांच्याकडे गोवा बनावटीचे अवैध मद्य आढळून आले. यात ओल्ड मंक असे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मिली मापाच्या, 300 रु. किंमतीच्या 4 बाटल्या; बुलेट-77 असे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मिली.च्या, 300 रु किंमतीच्या 6 बाटल्या; मॅजिक मोमेंट्स असे लेबल असलेल्या 750 मिली. मापाच्या, 1600 रु. किंमतीच्या 2 बाटल्या; हनी बी असे लेबल असलेली 750 मिली. मापाची 440 रु. किंमतीची 1 बाटली; रॉयल स्टॅग लेबलची 2000 मिली. मापाची, 1840 रु. किंमतीची 1 बाटली; हनी बी लेबलची 180 मिली. मापाच्या 100 रु. किंमतीच्या 4 बाटल्या असे एकूण 8 हजार 880 रुपयांचे गोवा बनावटीचे अवैध मद्य मिळून आले. तसेच 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली.