बांदा : सिंधुदुर्ग-गोवा सीमाभागात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ हत्ती रविवारी रात्री वाफोली परिसरातून डेगवेच्या दिशेने गेला. यावेळी त्याने पानवळ येथील संजय केरकर यांच्या बागेत घुसून मोठे नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्री ओंकार हत्तीचा वावर वाफोली परिसरात दिसून आला. त्यानंतर तो डेगवेच्या दिशेने जात असताना पानवळ येथे संजय केरकर यांच्या बागेत शिरला. हत्तीने बागेतील झाडांची मोडतोड करत नुकसान केले. सकाळी हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘ओंकार’ हा हत्ती गेल्या काही महिन्यांपासून सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग तसेच गोवा सीमाभागात सतत फिरताना दिसत आहे. कळपापासून वेगळा झाल्याने त्याचा स्वभाव अधिक आक्रमक बनल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही त्याने शेती, बागायती तसेच वाहनांचे नुकसान केले असून अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी वाफोली परिसरातच ओंकार हत्तीने वाहनांची मोडतोड केली होती. त्यामुळे वन विभाग सतत त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मात्र, तो वारंवार स्थान बदलत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, हत्तीच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत असून वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.