सावंतवाडी ः नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास असलेले आणि सातार्डा (तरचावाडा) येथील मूळ रहिवासी प्रशांत गजानन बागकर (50) यांचा रविवारी सकाळी गोवा-कुठ्ठाळी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. दुचाकी आणि कदंबा बस यांच्यात झालेल्या समोरासमोर धडके झाली. यात गंभीर जखमी झाल्याने श्री. बागकर यांचा मृत्यू झाला. यामुळे सातार्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशांत बागकर हे दुचाकीवरून सातार्डा ते वास्को जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या कदंबा बसशी त्यांची जोरदार धडक झाली. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धार्मिक कार्यक्रमासाठी गावी आले होते प्रशांत बागकर हे कामा निमित्त गोव्यात रहातात. शनिवारी सातार्डा-तरचावाडा येथील महापुरुष मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी ते आपल्या कुटुंबासह मूळ गावी आले होते. पूजा आटोपून परत कामावर जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. प्रशांत बागकर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे एका हसतखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.