Murder Pudhari
सिंधुदुर्ग

Goa Murder Case : गोव्यातील महिलेच्या खूनप्रकरणी शिरशिंगेच्या तरुणाला अटक

पळून गेलेल्या सागर राऊळला ठाणे पोलिसांनी पकडले

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : गोव्यातील चिकणे कुडणे साखळी येथील शैला संजय घाडी (५८) या महिलेला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे मळईवाडी येथील संशयित सागर रमेश राऊळ (३४) याला गोवा-डिचोली पोलिसांनी वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या मीरा-भाईंदर येथील गुन्हे शाखा युनिट चार या पोलिसांच्या मदतीने गोवा डिचोली पोलिसांनी पकडले आहे. एकतर्फी प्रेमातून आणि मुलीशी लग्न करण्यास विरोध केल्यामुळे तिच्या आईचा खून केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सागर राऊळ हा गोव्यामध्ये नोकरी करत होता आणि तो तिथे राहत होता. त्याचा आणखी एक मोठा भाऊ गोवा येथे स्वतंत्रपणे राहत आहे. शिरशिंगे गावामध्ये सागर याचे आई-वडील राहतात आणि ते शेतकरी आहेत. सागर याचे गोवा येथील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. यातून त्या मुलीने आपल्याशी लग्न करावे, असे सागर याला वाटत होते. या दरम्यान सहा महिन्यांपूर्वी सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्या मुलीने तक्रार नोंदवली होती. शिरशिंगे गावातील सरपंच, पोलिस पाटील यांनी हे प्रकरण दोघांचीही समजूत काढून मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तसे सर्व काही शांत होते. गावचे सरपंच, पोलिसपाटील यांनी आपल्या गावातील या तरुणाची समजूत काढली होती.

दरम्यान, पुन्हा एकदा संशयित सागर राऊळ याने शैला घाडी यांच्यासमोर तिच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव फेटाळल्याने सागर याने शैला घाडी यांना मारहाण केली, या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. हा खुनाचा गुन्हा घडल्यानंतर सागर हा आपल्या शिरशिंगे गावी न येता थेट ठाणे-मीरा-भाईंदर भागात फरार झाला. मंगळवारी १९ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास हा खुनाचा गुन्हा घडला होता.

त्यानंतर तो रेल्वेने मीरा-भाईंदर येथे गेला असावा असा संशय आहे. गोवा पोलिस या घटनेनंतर सागरच्या मागावर होते. यावेळी त्याचे मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक बाबींमुळे तो मीरा-भाईंदर येथे असल्याचे पोलिसांना कळले. मीरा-भाईंदर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मीरा-भाईंदर पोलिसांच्या मदतीने डिचोली पोलिसांनी सागर राऊळ याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला मीरा-भाईंदर ठाणे येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रांझिट रिमांडसाठी हजर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT