उदय बापर्डेकर
आचरा : मालवण तालुक्यातील तोंडवळी - तळाशील येथील माजी सरपंच संजय केळूसकर यांच्या मालकीच्या समुद्रकिनारी असलेल्या गाज रिसॉर्टच्या दर्शनी भागातील चार खिडक्यांच्या काचा रविवारी (दि.२७) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेत केळूसकर यांचे अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांनी याबाबत मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संजय केळूसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी आणि पत्नी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. आमचा मुलगा घरी एकटाच होता. रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने रिसॉर्टच्या दर्शनी भागातील काचा फोडल्या. सोमवारी (दि.२८) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रिसॉर्टमधील वस्तूंना हात लावण्यात आलेला नाही, त्यामुळे चोरीचा उद्देश नसावा. मात्र, दहशत निर्माण करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असावा," असे केळूसकर यांनी सांगितले.
या प्रकरणी केळूसकर यांच्या मुलाने मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे चिंता व्यक्त होत आहे.