सिंधुदुर्गनगरी ः डॉ. रविकांत नारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागरण समितीचे व आंबा बागायतदार व इतर. (छाया ः संजय वालावलकर) pudhari photo
सिंधुदुर्ग

Mango Research: गिर्ये- रामेश्वर आंबा संशोधन केंद्रात नेमके काय संशोधन होते?

सुराज्य अभियान व आंबा उत्पादक शेतकर्‍यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

ओरोस: गिर्ये येथे उभारलेले आंबा पिक संशोधन केंद्रातूनआंबा उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन होणे अपेक्षीत आहे. मात्र या केेंद्रातून आंबा पिक संशोधन, रोग प्रतिबंधात्मक उपाय , खत व्यवस्थापन याबाबत काहीही मार्गदर्शन होत नाही. या केंद्राची स्वतः ची आदर्श आंबा बाग नाही, आंबा हंगाम सुरू असताना संशोधन केंद्रातील अधिकारी गायब. तरीही दरवर्षी या केंद्रावर 5 कोटी पेक्षा जास्त खर्च होतो, तो कशावर खर्च होतो ही संशोधनाची बाब आहे.

याबाबत शासन, कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रमुखांनी चौकशी करावी, अन्यथा जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना घेऊन गिर्ये आंबा संशोधन केंद्राविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सुराज्य अभियान सिंधुदुर्गचे डॉ. रविकांत नारकर व आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी दिला आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे सुराज्य अभियानच डॉ. रविकांत नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. डॉ. नारकर म्हणाले, दरवर्षी फळमाशी, तुडतुडा अशा अनेक कीटक व बुरशीजन्य रोगांनी हापूस आंबा पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.

खरेतर याबाबत गिर्ये केंद्रातून संशोधन होऊन आंबा उत्पादक शेतकर्‍यांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र, गिर्ये-रामेश्वर आंबा संशोधन केंद्रातून काहीही उपयुक्त काम होत नाही. शासन येथील अधिकारी, कर्मचारी व शास्त्रज्ञांच्या पगारापोटी 5 कोटींहून अधिक रू. खर्च करते. या रक्कमेतून नेमके काय संशोधन केले जाते? हा आमचा प्रश्न आहे. ऐन आंबा पिकाचा हंगाम सुरू होतानाच गिर्ये-रामेश्वर आंबा संशोधन केंद्रातील अधिकारी गायब असतात. संशोधन केंद्राला संपर्क करण्याची सुविधा नाही.

फोन करायचा असेल तर अधिकार्‍यांच्या वैयक्तिक नंबरवरच करायचा, अशा पद्धतीने चुकीचे कामकाज सुरू असल्याचा आरोप सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. नारकर यांनी केला. श्रीकृष्ण दुधवडकर म्हणाले, आम्ही गिर्ये-रामेश्वर आंबा संशोधन केंद्रातील अधिकारी श्री. मुंज यांना संपर्क केला असता त्यांनी आपण सध्या मुंबईत आहे आणि केंद्रात कोणीही नाही, आंबा पिकाबद्दल काही माहिती हवा असल्यास, ती आपण आल्यावरच मिळेल, असे सांगितले.

दीपक वारिक यांनी फळकिडी बाबत कुठले औषध फवारायचे असे विचारल्यावर श्री. मुंज यांनी एरवी जी वापरता तीच औषधे मारा असे मोघम उत्तर दिले. खरेतर सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचा प्रभाव फळमाशीवर पडत नाही ही वस्तुस्थिती असताना आणि याविषयी पत्रव्यवहार सुद्धा केलेला असताना, अशी उत्तरे दिली जात आहेत हे गंभीर आहे. अशातून सिंधुदुर्गाच्या महत्त्वाच्या ओळखीपैकी एक ओळख असलेला हापूस आंबा नष्ट होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सुराज्य अभियानाचे भास्कर खाडीलकर म्हणाले, आंबा पिकावर येणारे आजार आणि एकूणच हंगामात घ्यायची काळजी याविषयी एक कायमस्वरुपी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असायला हवा, अधिकारी बदलला की फोन नंबर बदलला असे व्हायला नको. याशिवाय कोणती औषधे वापरायची, ती कशी वापरायची, ती वापरून बाग कशी तयार होते, याची नमुना बाग या संशोधन केंद्रात निर्माण होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक असेल तर आंदोलन करू असे त्यांनी सांगितले.

देवगड तालुक्यातील आंबा व्यापारी दीपक वारीक, विकास दीक्षित, रवींद्र कारेकर, अशोक करंगुटकर, रवींद्र परब सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरू सत्यवान कदम, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर तसेच हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.

भविष्यात ‘देवगड’ ऐवजी ‘सोलापूर हापूस’ बाजारात येईल!

मुख्यत्वे कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या या संशोधन केंद्रातून स्थानिक आंबा उत्पादकांच्या समस्या, प्रामुख्याने उद्भवणारे रोग, नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती आदीबाबत संशोधन व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र, येथील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना परराज्यातून, परजिल्ह्यातून येणारी फवारणी औषधे, कीटकनाशके घ्यावी लागतात, मग या संशोधन केंद्र कुणासाठी सुरू आहे? हा प्रश्न आहे.

राज्यात अन्य जिल्ह्यात सुरू असलेली कृषी संशोधन केंद्रे त्या त्या जिल्ह्यातील प्रमूख पिकावर मार्गदर्शन करतात. मात्र, गिर्ये आंबा संशोधन केंद्राकडून याबाबत काडीमात्रही काम होत नाही. यामुळे भविष्यात ‘देवगडचा हापूस’ ऐवजी ‘सोलापूरचा हापूस’ नावारूपास येईल, परिणामी येथील आंबा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होईल व कोकणचा हापूस कायमचा नामशेष होईल, अशी भीती सुराज्य अभियान सिंधुदुर्गचे डॉ. रविकांत नारकर व आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT