16 ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात
बस, रेल्वेस्थानकांवर पोलिस बंदोबस्त
संजय वालावलकर
ओरोस : कोकणचा महाउत्सव असलेल्या श्री गणेशोत्सवाला बुधवार, 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यात या वर्षी 72 हजार 755 घरगुती, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे 32 श्रीगणेश विराजमान होणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली.
गणेशोत्सवासाठी येणार्या कोकणवासीयांच्या आरोग्य तपासणीसाठी एसटी स्थानक व रेल्वे स्थानकावर 16 ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व बस व रेल्वेस्थानके, महामार्ग आणि सर्व घाट मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः दीड ते अकरा दिवसांपर्यंत गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असतो. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. घराची रंगरंगोटी व सजावट सुरू आहे. बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यांतून गावी येणार्या भाविकांच्या माध्यमातून ताप, डेंग्यू, मलेरिया आदी साथरोग पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानके, बसस्थानकांवर 16 आरोग्य पथके तैनात केली आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करून तापसरीची लक्षणे आढणार्या प्रवाशांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- 4, सावंतवाडी 7, आचरा 1, मालवण 2, कणकवली 5, बांदा 1, कुडाळ 4, वेंगुर्ला 3, देवगड 1, वैभववाडी 4 अशा एकूण 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार आहे.