काशिराम गायकवाड
कुडाळ : तळकोकणात सर्वत्र श्री गणेश चतुर्थी दिवशी घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. पण कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे साळगावकर कुटुंबीयांच्या घरात चक्क चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. विशेष म्हणजे या गणपतीची त्यानंतर वर्षभर नित्य पूजा केली जाते. मागील वर्षभर पूजन केलेल्या गणेश मूर्तीचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी विसर्जन करून, नवीन गणेश मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. साळगावकर कुटुंबिय ही अनोखी परंपरा वर्षांनुवर्ष जोपासत असून, त्यांचा हा गणेशोत्सव आगळा-वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे.
कृष्णा शंकर साळगावकर हे स्वतः गणेश मूर्तीकार आहेत. त्यांच्या घरात पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार साळगावकर हे गणेश मूर्ती बनविण्यास सुरुवात करण्यापूर्वी इतर गणेश मूर्ती शाळांप्रमाणे मुहूर्ताचा गणपती प्रथम बनवितात.
श्री. साळगावकर याच गणेशमूर्तीची आपल्या घरी प्रतिष्ठापना करतात. या गणेश मूर्तीत आणखी एक लहान मूर्ती म्हणजे गण असतो. साळगावकर हे गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी या गणेश मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना घरी करतात. हा गणपती वर्षभर घरात ठेवला जातो. पाचव्या दिवशी सायंकाळी मागील वर्षभर पूजन केलेल्या गणेश मूर्तीचे थाटामाटात विसर्जन करून, त्यानंतर या गणपतीचे पूजन करण्यात येते. दररोज पूजा, आरती यासारखे नित्याचे उपक्रम वर्षभर घरात होतात. माघी गणेश जयंती कार्यक्रमही मोठ्या उत्साहात त्यांच्या घरी साजरा करण्यात येतो. माघी गणेश जयंती आणि संकष्ट चतुर्थी दिवशी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
साळगावकर कुटुंबिय मूळचे कुडाळ कविलकाटे येथील असून, काही वर्षांपूर्वी ते सांगिर्डेवाडी येथे स्थायिक झाले आहेत. कृष्णा साळगावकर यांची परिस्थिती जेमतेम आहे. तरीही हे कुटुंबिय वर्षभर श्री गणेशाची आनंदाने व मनोभावे पूजा, आराधना, सेवा करतात.
वडील कृष्णा साळगावकर यांना विपुल व वैभव या दोन्ही मुलांचे ही गणेश मूर्ती बनविण्यास सहकार्य लाभते. हे पिता- पुत्र हाती गणेश मूर्ती बनवून रंगकाम करतात. सध्या जास्त गणेश मूर्ती बनवित नाहीत पण आपल्या घरची गणेश मूर्ती अर्थात मूर्ती शाळेच्या मुहूर्ताचा गणपती ते बनवितात. रविवार 31 ऑगस्ट रोजी साळगावकर कुटुंबियांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. साळगावकर यांचा हा कोकणातील आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा गणेशोत्सव ठरत आहे.