सावंतवाडी : भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहराने प्रतिसाद दिला. तेव्हा पासून गेल्या 119 वर्षांपासून सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदा या गणेशोत्सवाचे 120 वे वर्ष असून सालईवाडा गणेशोत्सव मंडळाकडून 21 दिवसांचा हा उत्सव आजही जल्लोषात साजरा केला जात आहे.कोकणातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जाणारा हा गणेशोत्सव सावंतवाडी शहरासाठी भूषणावह आहे.
लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेतून 1894 मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. लो. टिळकांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सावंतवाडी-सालईवाडा येथे सन 1906 मध्ये कै. विष्णुशेठ सापळे व कै. सीतारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली.
सुरुवातीला कै. केशव सापळे, कै. राजाराम बांदेकर, कै. राजाराम सापळे, कै. गोविंद विरनोडकर, कै. गोविंद मिशाळ, कै. गोपाळ कद्रेकर, कै. बाळकृष्ण पेडणेकर, कै. शांताराम गोवेकर, कै. आबा तळवणेकर, कै. यशवंत सापळे या मंडळींच्या पुढाकारातून हा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाऊ लागला. आजही या मंडळाच्या माध्यमातून गणरायाची 21 दिवस मनोभावे सेवा केली जाते. संस्थानकालीन कालखंडामध्ये सालईवाडा येथील कै.विष्णुशेठ सापळे व कै. सीताराम शेठ बांदेकर हे संस्थानच्या सेवेत होते. त्यांच्या प्रयत्नांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी राज दरबारातून सर्व साहित्य पुरविले जायचे. तसेच श्रीगणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी पालखी, श्रृंगारलेले घोडे वाद्यवृंद, भोई पुरविले जात असत. श्रींच्या मूर्तीची ही वैभवशाली विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील लोक उपस्थित राहत. सावंतवाडी संस्थानचे रामराजा श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे श्रींच्या दर्शनासाठी आवर्जून येत असत.
त्याकाळी सालईवाड्यातील तरुण मंडळीं बरोबरीने महिलाही गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असत. गणेशोत्सवाचे कार्यक्रमामध्ये भजन, कीर्तन, प्रवचनाबरोबरच शहरातील उच्च विद्याविभूषित, तत्वज्ञानांची प्रबोधनपर भाषणे होत. सन 1940 ते 1950 या कालखंडामध्ये सि.द.पडते (दादा),अण्णा सावंत, भास्कर निखार्गे, गुंडू बांदेकर, सखाराम (चिटलिंग) चौकेकर, शाम चिंगळे, दत्ता वेंगुर्लेकर, भाऊ सापळे, तात्या सापळे, आगा, मोतीराम नार्वेकर, पांडुरंग ठाकूर, काशिनाथ कुडतरकर, दादा भोसले, आबा पेडणेकर, जगन्नाथ व विश्वनाथ तळवणेकर यांनी मंडळातील ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली या सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी सांभाळली.
या काळात स्वातंत्र्य लढ्यानं उग्र स्वरूप धारण केले होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमांतून स्वातंत्र्यासाठी जनजागृतीचे काम या मंडळाने केले. यातून प्रेरणा घेत परिसरातील अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. या कालखंडामध्ये गणपतीची आकर्षक मूर्ती तयार करणे व सजावट करण्याची जबाबदारी कै. आबा पेडणेकर यांनी सांभाळली होती. दर आठवड्याला सजावटीमध्ये बदल केला जात होता. यामुळे शहरामध्ये या गणेशोत्सवाचे आकर्षण मोठे होते. या काळात साफसफाई, दिवाबत्ती या महत्त्वाच्या बाबी बांदेकर कुटुंबियांनी सांभाळल्या होत्या. सन 1951 ते 1980 या कालखंडामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सि.द.पडते यांनी सांभाळली. 1989 ते 1990 या कालखंडामध्ये अमरनाथ सावंत व राजा स्वार यांच्यावर गणेशोत्सवाची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान सापळे कुटुंबियांच्या ज्या वास्तूमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. ती संपूर्ण वास्तू जमिनीसह सन 1990 मध्ये श्रीमती राधाबाई केशव सापळे यांनी त्यांचे पती कै.केशव विष्णू सापळे यांच्या स्मरणार्थ मंडळाचे नावे करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर 12 जाने. 1990 रोजी नाना सापळे यांनी सापळे कुटुंबियांच्यावतीने ही वास्तू बक्षीसपत्राने मंडळाकडे सुपुर्द केली. सध्या या मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार तर उत्सव कमिटी अध्यक्ष म्हणून प्रतीक बांदेकर कार्यरत आहेत.
यंदाचे 120 वे वर्ष असून 21 दिवसांत मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा गणरायासमोर जिल्हा परिषद शाळेचा आकर्षक असा देखावा साकारण्यात आला आहे. दररोज आरती, भजनासह विविध कार्यक्रम या ठिकाणी भक्तिभावानं पार पडतात. तसेच यावर्षीही आरोग्य तपासणी शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.