मुंबई : बैठकीस उपस्थित मंत्री नितेश राणे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व अधिकारी. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Fruit Crop Insurance | फळपीक विम्याचा पहिला हफ्ता दिवाळीपूर्वी

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालयात विशेष बैठक

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (सन 2024-25) संदर्भात मंगळवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नुकसानभरपाईच्या विलंबाबाबत मंत्री राणे यांनी नाराजी व्यक्त केली. चर्चेदरम्यान फळपीक विमा योजनेचा पहिला हफ्ता दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन विमा कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिले.

जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकर्‍यांच्या तक्रारी मंत्री नितेश राणे यांनी कृषिमंत्र्यांसमोर सविस्तर मांडल्या. भारतीय कृषी विमा कंपनीच्या चालढकल कारभारामुळे शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन मंत्री श्री. राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी तंबी देत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपली चूक मान्य करत दिवाळीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकर्‍यांना पीक विम्याचा पहिला हफ्ता वितरित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी विमा कंपनीला ही शेवटची संधी असून, पुन्हा हलगर्जीपणा झाल्यास गय केली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले.

या बैठकीस अपर मुख्य सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार औटी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री नाईक-नवरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT