Arrested Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या चाैघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अन्‌ सावंतवाडी पोलिसांची कारिवडे येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे -बिलेवाडी रस्त्यावरील एका पडक्या घरात अवैधरीत्या अमली पदार्थांची खरेदी-विक्री व देवाणघेवाण करणाऱ्या संशयितांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने छापा टाकत कारवाई केली. शनिवारी सायंकाळी उशिरा केलेल्या या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी ६ हजार रुपये किमतीचा २०० ग्रॅम गांजा या कारवाईत जप्त केला.

रविवारी फरार संशयित विशाल वडार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी एकूण चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारिवडे-बिलेवाडी रस्त्यावर निर्जन ठिकाणी पडके घर आहे. त्या घराच्या व्हरांड्यात चार संशयित गांजासदृश अमली पदार्थांची विक्री व देवाण-घेवाण करत होते. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून छापा टाकत चारही संशयितांना पकडण्यात आले, मात्र विशाल वडार हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २०० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला.

रविवारी फरार विशाल वडार यालाही पोलिसांनी पकडले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५' (NDPS Act) च्या विविध कलमांन्वये संशयित सुनील श्रीकांत मुदगल (२६, रा. करिवडे पेडवेवाडी), अमर मारुती धोत्रे (२३, रा. करिवडे पेडवेवाडी) चंद्रप्रकाश पलठण प्रजापती (३४, रा. गवळीतिठा, सावंतवाडी), विशाल वडर (२२, रा. सावंतवाडी) या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या सर्वांना अटक करून रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहा.पोलिस निरीक्षक श्री. हिंगे, पी.एस.आय. राजेश हडळ, हवालदार प्रकाश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT