कुडाळ : कुडाळ तालुक्यातील झाराप येथे राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्य बजावत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आ. वैभव नाईक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभाग-सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश राकेश साळुंके (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील असून सध्या आनंदवन, पिंगुळी, कुडाळ येथे वास्तव्यास आहेत. मंगळवार 30 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5 वा.च्या सुमारास ते झाराप येथे मुंबई-गोवा महामार्गावर वरिष्ठ अधिकारी वृषाली पाटील यांच्या समवेत कर्तव्यावर असताना माजी आम. वैभव नाईक यांनी त्यांना कानशिलात मारली. तसेच जातीवाचक शब्दांचा वापर करत अपमानास्पद भाषा वापरली आणि पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री 10.47 वा. वैभव नाईक यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीची गंभीरता लक्षात घेता पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक श्री. मगदूम, तसेच सहा. पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.