सावंतवाडी : विलवडे-धनगरवाडी येथे वस्तीच्या ठिकाणी दाखल झालेल्या ओंकार हत्तीला हुसकाविण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रॉकेट शॉटचा वापर केल्याची घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे मंगळवारी संध्याकाळी ओमकार हत्ती दाखल झाला असता, त्या ठिकाणी भात कापणी सुरू होती. यावेळी भाताचे नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी वन कर्मचारी यांना ओंकार याला हुसकावून लावण्यास सांगितले असता. रॉकेट शॉटचा वापर करावा लागला, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
मागील तीन दिवस ओमकार हत्ती सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, बांदा, विलवडे, रोणापाल या गावांमध्ये फिरत आहे. १४ वर्षीय असलेल्या ओमकार हत्तीने आपल्या वावराने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. ओमकारला बहुतांशी ठिकाणी पाहण्यासाठी एकीकडे गर्दी होत आहे. तर दुसरीकडे त्याला मानवी वस्ती, शेती बागायतीपासून दूर ठेवण्यासाठी वन विभागाचे आरआरटी पथक स्वतः चा जीव धोक्यात घालून अथक प्रयत्न करत आहेत.
मंगळवारी तो संध्याकाळी विलवडे-धनगरवाडी भागात आला असता तिथे ग्रामस्थ भात कापत होते. ते त्याला बघून भयभीत झाले. कापलेले भात नासधूस करेल या भीतीने शेतकरी यांनी त्याला शेतीपासून दूर ठेवण्याची विनंती वन कर्मचारी यांच्याकडे केली. यावेळी त्याला येथून हुसकावून लावण्यासाठी कर्मचारी यांनी सणासुदीत वापरण्यात येणारे फटाके, रॉकेट शॉट ओंकार याच्या अंगावर सोडले. त्यामुळे बिथरलेला ओमकार याने तेथून पळ काढला. त्याला पळवून लावण्यासाठी अशा साधनांचा उपयोग करावा लागतो, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांनी दिली. तर बाहेर असल्याने त्यांनी अधिक बोलणे टाळले.