कसई जंगलातील खैर तस्करीवर वन विभागाची कारवाई 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कसई जंगलातील खैर तस्करीवर वन विभागाची कारवाई

वन विभागाच्या गस्ती पथकाची गुरुवारी पहाटे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : कसई वनक्षेत्रात सुरू खैर तस्करीविरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी पहाटे वनविभागाने रचलेल्या सापळ्यात दोन संशयितांना खैराची झाडे तोडताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत खैर लाकूड, तीन वाहने, मोबाईल फोन आणि सायलेंट कटर मशीन असा एकूण ३ लाख ७१ हजार ७७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुरुवारी पहाटे ४.३० वा. कसई येथील वन सर्वे क्रमांक १७० मध्ये वनकर्मचऱ्यांची गस्त सुरू होती. यावेळी जंगलातून झाडे कापण्याच्या मशीनचा आवाज ऐकू आल्याने पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी तीन व्यक्ती खैराची झाडे तोडताना आढळले. वन कर्मचाऱ्यांनी यातील पांडुरंग महादेव गांवकर (रा. उसप, ता. डिचोली-गोवा) आणि श्याम नवनाथ तुळसकर (रा. नानोडा, ता. डिचोली-गोवा) यांना घटनास्थळी ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्यासोबत असलेला एक संशयित अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१) आणि ४१(२)(ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार नीतेश नारायण नाईक आणि किसन शशिकांत गांवकर (दोघेही रा. उसप, ता. डिचोली, गोवा) यांना गुरूवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील, वनपाल तुकाराम हाक्के, वनरक्षक शैलेश कांबळे, शुभम वारके, वनसेवक विश्राम कुबल तसेच जलद बचाव पथकातील बाबू वरक, जानू पटकारे आणि विलास खरवत यांनी संयुक्तपणे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT