वनविभाग आणि पोलिस विभाग संयुक्तपणे रोखणार वन्यजीव गुन्हे 
सिंधुदुर्ग

Wildlife Crime : वनविभाग आणि पोलिस विभाग संयुक्तपणे रोखणार वन्यजीव गुन्हे

प्रत्येक जिल्ह्यात होणार दोन्ही विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : वन्यजीवांच्या वाढत्या शिकारी, अवयवांची तस्करी, बेकायदा वाहतूक यासह संघटित वन्यजीव गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वनविभाग आणि पोलिस विभागाची यंत्रणा आता संयुक्तपणे काम करणार आहे. आतापर्यंत वन्यजीव संबंधित बहुतांश गुन्हे वनविभागाचीच यंत्रणा उघडकीस आणून कारवाई करत होती. आता मात्र ही कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी आणि अशा वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी वनविभागाच्या मदतीला पोलिस विभागाची यंत्रणाही एकत्र येऊन काम करणार आहे. केवळ शिकारी किंवा तस्कराला पकडण्याऐवजी त्यामागील गुन्हेगारी साखळीपर्यंत पोहोचून कारवाई केली जाणार आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीवानिवास रेड्डी यांनी या संदर्भात संयुक्त परिपत्रक काढले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वनविभाग आणि पोलिस विभागातील पोलिस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

वन्यजीव संबंधी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता हे दोन्ही विभाग काम करत असताना त्यासाठी जिल्हास्तरावर वनविभाग आणि पोलिसांच्या नियमित संयुक्त बैठका, गुप्त माहितीची देवाण घेवाण, संयुक्त कारवाई आणि तपासाचा आढावा घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. वन्यजीव गु्न्ह्यांशी संबंधित माहिती दोन्ही विभागांनी परस्परांना उपलब्ध करून देणे, संशयितांच्या हालचाली आणि गुन्ह्यांच्या तपासाचा समन्वय साधणे आणि प्रकरणनिहाय तातडीने कारवाई करणे ही जबाबदारी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहणार आहे. विशेषत: गंभीर प्रकरणांमध्ये दोन्ही विभागांनी संयुक्त तपास पथक स्थापन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वन्यजीव क्षेत्रातील मान्यवरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. वन्य प्राण्यांची शिकार, अवयवांची बेकायदा तस्करी, व्यापार यासारख्या संघटीत वन्यजीव गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. वन आणि पोलिस विभाग हे सरकारचेच दोन विभाग आणि त्या विभागातील तज्ज्ञ एकत्र आले तर निश्चितपणे या गुन्ह्यांना आळा घालता येईल. हा उद्देश साध्य करण्यासाठी विभागांनी उचललेले हे एक स्वागतार्ह पाऊल असल्याचे म्हटले आहे.

गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रशिक्षण

वन आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांसाठी दरवर्षी संयुक्त प्रशिक्षण घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वन्यजीव कायदे, गुन्ह्यांचा तपास, पुरावे गोळा करणे, वन्यजीव न्यायवैधक, सायबर व ऑनलाईन वन्यजीव व्यापार, गुप्तचर माहिती, तपास तंत्र आणि न्यायालयातील अभियोग याचा या प्रशिक्षणात समावेश असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT