बांदा : कस्टमच्या नावे हरियाणातून गोवा राज्यात होणार्या उंची विदेशी ब्रँडच्या मद्यतस्करीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर रविवारी कारवाई केली. ट्रक चालकाला ताब्यात घेत तब्बल 75 लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला. महाराष्ट्रासह तब्बल चार राज्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करताना या ट्रकवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इतर राज्यातून गोव्यात होणार्या बेकायदा दारू वाहतुकीवर ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.
हरियाणामधून आलेल्या ट्रकमधून नामांकित विदेशी ब्रँड्सच्या मद्याच्या बाटल्यांचा साठा सापडला आहे. या कारवाईत चिव्हास रीगल, अब्सोल्यूट व्होडका, जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल अशा उच्च दर्जाच्या मद्य ब्रँड्सच्या सुमारे 75 लाख रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ट्रकमध्ये कस्टमसाठी मद्य पाठवले जात असल्याचा बनाव करण्यात आला होता. त्यासाठी खोटी कागदपत्रे व परवाना तयार करण्यात आला होता. मात्र चौकशीत मद्य वाहतूक करण्यासाठी आवश्यक कोणतीही अधिकृत परवानगी ट्रकचालकाकडे नव्हती. तसेच दाखविलेली कागदपत्रे देखील खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय मद्याच्या बाटल्यांवर लेबल नव्हती आणि कस्टमच्या मंजुरीची पूर्तता झालेली नव्हती.
ट्रक चालकाने सुरुवातीला माल ‘कस्टम्स’साठी असल्याचे सांगितले होते. मात्र, ट्रकमध्ये आढळलेल्या 750 मिलीच्या बाटल्या केवळ किरकोळ विक्रीसाठी वापरल्या जात असल्याने तपासणी पथकाला शंका आली. त्यामुळे चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या.
चौकशीत या मद्यसाठ्याचा संबंध दक्षिण गोव्यातील आल्त पिळर्ण (गोवा) येथील एका गोदामाशी असल्याचे उघड झाले. तेथे पथकाने धाड टाकली असता काही महत्वाची कागदपत्रे तसेच मुद्देमाल सापडला. गोव्यात इतर राज्यातून होणार्या मद्य तस्करीची ही पहिलीच नोंद असून संबंधित हरियाणास्थित कंपनीचा गोव्यातील घाऊक परवान्याची पथक माहिती घेत आहे.