देवगड ः समुद्रातील वादळसद़ृश वातावरणाचा मोठा फटका यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच मच्छीमारी व्यवसायाला बसला. या प्रतिकूल परिस्थितीमुळे हंगामाला सुरुवात झाल्यापासूनच ग्रहण लागले. परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस, कमी दाबाचा पट्टा, सागरी वादळे आदी विविध कारणांमुळे गेले तीन महिने सागरी वातावरण वरचेवर बदलत असल्याने सागरी मासेमारी ठप्प होती; मात्र आता समुद्र शांत झाला असून वादळी वातावरण निवळल्याने मच्छीमारी व्यवसायही आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. मासळी विक्रीसाठी गजबजणारे लिलाव सेंटरही सुरू झाले आहेत.
मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसाय वारंवार ठप्प होत होता. अवकाळी पाऊस व वादळसद़ृश वातावरण यामुळे किनारपट्टी भागाचे अर्थकारण अवलंबून असणार्या आंबा व मच्छीमारी व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोन्था चक्रीवादळामुळे समुद्र खवळल्याने खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. यावर्षी 1 ऑगस्ट रोजी मासळी हंगाम सुरू झाल्यानंतर समुद्री वादळांचे प्रमाणही वाढले, यामुळे मच्छीमारी व्यवसावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यांत्रिकी नौंकांद्वारे, न्हैय, कांडाळीद्वारे करण्यात येणारी मच्छीमारी पूर्णत: बंद होती. यामध्ये यांत्रिकी नौकांची मच्छीमारी तर गेले महिनाभर बंद होती. मच्छीमारी व्यवसायच ठप्प असल्याने बाजारपेठेत मासळीची आवक खूप घटली. परिणामत: मासळीचे दरही गगनाला भिडले होते.
ऑक्टोबर महिना तर वादळसदृश स्थितीतच गेला. वादळी स्थितीमुळे स्थानिक नौकांबरोबरच गुजरात राज्यातील नौकाही देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या होत्या. गेल्या अर्धा ते पाऊण महिने वादळसदृश स्थितीमुळे मच्छिमारी बंद होती. यामुळे मासेमारी व्यवसायावर अवलंबून इतर व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली, ते कर्जबाजारी झाले. या परिस्थितीचा विचार करून शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करून प्रत्येक मच्छिमाराला आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही मच्छिमारांनी केली आहे. मच्छिमारी व्यवसाय सुरू झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असणार्या इतर व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण असून वातावरण पूर्ण निवळले असल्याचे स्थानिक मच्छीमारी विकास कोयंडे यांनी सांगितले.